रेनकोटमधून बाळ कधी पडले समजलेच नाही, आजोबांनी सांगितला घटनाक्रम | पुढारी

रेनकोटमधून बाळ कधी पडले समजलेच नाही, आजोबांनी सांगितला घटनाक्रम

ठाणे : पुढारी वृत्तसेवा – लोकल तब्बल दोन तास जागेवर उभी राहिल्यामुळे आजारी असलेल्या सहा महिन्याच्या बाळाला हवेत बरं वाटावं यासाठी बाळाची आई आणि तिचे आजोबा लोकलमधून खाली उतरले. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान आपल्या सहा महिन्याच्या बाळाला रेनकोटमध्ये गुंडाळून घेऊन जात असताना आधी बाळाच्या आईचा पाय घसरला, त्यामुळे आपल्या मुलीला सावरायला गेल्या वडिलांना त्यांच्या हातात असलेली सहा महिन्याची नात रेनकोटमधून कधी नाल्यात पडली हे समजलेच नाही. बाळ नाल्यात पडल्यानंतर लोकांनी बाळ पडल्याचा आरडाओरड केल्यानंतर बाळ पडल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत हे सहा महिन्याचे बाळ नाल्यात वाहून गेले होते. बाळ नाल्यात वाहून गेल्याचा धक्का पचवू न शकलेल्या आईने आपल्या बाळासाठी जागेवरच हंबरडा फोडला. वाडिया हॉस्पिटलमध्ये या बाळाचे उपचार सुरु होते. वाडियामधून कल्याणला आपल्या घरी जाताना काळाने या बाळावर घाला घातला. ज्यांच्या हातातून आपली नात पडली त्या आजोबांनीच ही हृदयद्रावक घटना सांगितली.

जोरदार झालेल्या पावसामुळे अंबरनाथ लोकल कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान सुमारे दोन तास लोकल थांबली होती. या लोकलमधून बाळाचे आजोबा आणि त्यांची मुलगी योगिता रुमाल या आपल्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन भिवंडी येथे जात होते, अशी माहिती बाळाचे आजोबा ज्ञानेश्वर पोगुल यांनी दिली.

बाळाचे वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याने तिला प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलला न्यावे लागत होते. बुधवारीही वाडिया हॉस्पिटलमधून अंबरनाथ लोकलमध्ये बसल्यानंतर तांत्रिक कारणामुळे लोकल कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान दोन तास थांबली आणि आधीच आजारी असलेल्या आपल्या नातीला त्रास सुरु झाल्याने आम्ही इतर प्रवाशांसारखे लोकलमधून खाली उतरून चालण्याचा निर्णय घेतला असल्याचे ज्ञानेश्वर पोगुल यांनी सांगितले.

ट्रॅकवर चालत असताना आधी आपल्या मुलीचा पाय घसरल्यानंतर तिला कसेबसे सावरले. यादरम्यान माझ्या नातीला मी रेनकोटमध्ये गुंडाळून माझ्या हातात घेतले होते. मात्र माझा पायही घसरला आणि माझ्या हातात असलेली माझी नात रेनकोटमधून कधी नाल्यात पडली मला समजलेच नसल्याचे त्यांनी सांगितले. बाळ पडल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर बाळ रेनकोटमध्ये नसल्याचे आमच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत माझी नात नाल्यात वाहून गेली होती असे ज्ञानेश्वर पोगुल यांनी सांगितले.

भिवंडीत उपचार झाले असते तर ही वेळ आलीच नसती…

नाल्यात वाहून गेल्या सहा महिन्याच्या मुलीचे नाव दर्शिका असून तिला उपचारांसाठी प्रत्येक महिन्याला वाडिया रुग्णालयात घेऊन जावे लागत होते. याशिवाय तिच्या ऑपरेशनसाठी ५ लाखांचा खर्च देखील संगितला होता. मात्र जर भिवंडीमध्येच जर उपचारांची सुविधा असती तर ही वेळ आमच्यावर आलीच नसती अशी खंत ज्ञानेश्वर पोगुल यांनी व्यक्त केली.

रात्री उशिरा अखेर शोधकार्य थांबवले…

सहा महिन्याची दर्शिका दुपारी नाल्यात वाहून गेल्यानंतर दिवसभर तिचा शोध सुरु होता. मात्र दिवसभर शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. अखेर रात्री उशिरा दर्शिकाला शोधण्याचे काम थांबवण्यात आले. सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आणि सरकारी यंत्रणांनी दिली आहे.

Back to top button