Shashikant Shinde : भाजपची हुकूमशाही जनताच मोडून काढेल: आमदार शशिकांत शिंदे | पुढारी

Shashikant Shinde : भाजपची हुकूमशाही जनताच मोडून काढेल: आमदार शशिकांत शिंदे

तासगाव : पुढारी वृत्तसेवा: अति हुकूमशाही फार काळ चालत नाही, लोक सहन करतात याचा अर्थ त्यांना काही कळत नाही किंवा ते घाबरलेले आहेत, असा अर्थ घेऊ नये. जगाच्या इतिहासात अनेक हुकूमशाही सरकारे जनतेने उलथवून टाकली आहेत. भविष्यात याची प्रचिती देशात आणि राज्यातही पहायला मिळेल. भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही जनताच मोडीत काढेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)  यांनी तासगाव येथे आज (दि.२७) दिला.

येथील समृद्धी मल्टीपर्पज सभागृहात आयोजित बूथ मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार शिंदे बोलत होते.

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)  म्हणाले की, मी अनेक तालुक्यात मेळावे घेतले आहेत, परंतू तासगाव तालुक्यातील बूथ संघटन सर्वात चांगले असल्याचे दिसते. यापुढील काळात केवळ बुथ कमिटी तयार करुन गप्प बसून चालणार नाही, पक्षाची ध्येय धोरणे, सत्ता काळात केलेली विकासकामे व शरद पवार यांनी घेतलेले जनहिताचे ऐतिहासिक निर्णय याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.

सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. विरोधातील माणसं फोडायची, विकत घ्यायची ही भाजपची रणनिती आहे. या मार्गाने सत्ता मिळत नसेल तर यंत्रणांचा वापर करुन लोकांना अडचणीत आणून त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे काम भाजप करते. या सर्व गोष्टी गृहित धरुनच तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे.

आमदार अरुण लाड म्हणाले, दिवंगत आर. आर. पाटील यांनी या मतदारसंघाचा विकास केला आहे. हजारो कार्यकर्त्यांची फौज तयार करुन ठेवली आहे. त्यांच्या सहकार्याने युवा नेते रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचे काम करावे.

रोहित पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि युवकांनी एकत्रित येऊन संघटना मजबूत करावे. आगामी काळातील प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे.

यावेळी आमदार सुमन पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश पाटील, बी. एस. पाटील, चिमन डांगे, बाजार समिती संचालक रविंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, तालुकाध्यक्ष विश्वास माने- पाटील, बाळासाहेब पाटील, सतिश पवार, ताजुद्दीन तांबोळी, डी. के. पाटील, अनिल पाटील, अजित जाधव, संभाजी पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्ता हावळे, युवती आघाडीच्या वर्षा वाघमारे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Shashikant Shinde : साडेतीन जिल्ह्याचा पक्षच भाजपला घरी बसवेल

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, या राज्यातील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणून हिणवत आहेत. परंतू या साडेतीन जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच उमेदवार निवडून आले, तर भाजपची राज्यातील सत्ता हिसकावून घेऊन त्यांना घरी बसवू शकतो. याची प्रचिती येत्या काळात येईल, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे.

हेही वाचा 

Back to top button