राज्यातील विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

राज्यातील विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री शिंदे

विटा; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रालयात आज विणकर समाज आणि विशेष मागास प्रवर्गाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाती बैठक पार पडली, यावेळी ते बोलत बोते.

आमदार अनिल बाबर यांच्या पुढाकाराने आमदार कैलास गोरंट्याल, आमदार महेश चौगुले, आमदार देवयानी फरांदे, अ.भा.कोष्टी समाजाचे अध्यक्ष अरुण वरोडे, विशेष मागास प्रवर्ग महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापूरे, राज्य विणकर समाज संयुक्त कृती समितीचे संयोजक सुरेश तावरे, राजू गाजेंगी, ॲड. रामदास सब्बन आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

प्रारंभी अशोक इंदापुरे यांनी विशेष मागास प्रवर्गातील लोक पुरावे का सादर करु शकत नाही, याबाबतचे स्पष्टीकरण प्रतिज्ञा पत्रात सादर करावे, अशी मागणी केली. तसेच त्यावर सध्या चौकशी करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद कायद्यात आहे. परंतु त्यानुसार प्रमाणपत्रे मिळण्यास अडचणी येत आहेत, शिवाय त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहतात ही बाब इंदापूरे यांनी निदर्शनास आणून दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्र विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यासाठी संबंधित समिती अधिकाऱ्यांना सूचना करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रवेश प्रक्रियेत संबंधित उमेदवारांच्या जातीनुसार मूळ प्रवर्गाबाबत तपशील सॉफ्टवेअरमध्ये अंतर्भूत करण्याची सूचनाही केली. यावेळी विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेत २% आरक्षण वाचविण्यासाठी तसेच योग्य बाजू मांडण्यासाठी शासनातर्फे महाअधिवक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच या प्रवर्गाचे सामाजिक शैक्षणिक मागास लेणा संबंधी जुने समितीचे अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत विणकर समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली.

यावेळी प्रधान सचिव विकास खरगे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासह वस्त्रोद्योग, वित्त, नियोजन आदी विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसबीसी शिष्टमंडळाचे उत्तम राव चोथे, वैभव म्हेत्रे, सुनिल ढगे, उत्तम म्हेत्रे, दत्ता ढगे, गणेश तांबे, किशोर बेलसरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button