Miraj : मिरजेत भरदिवसा बंगला फोडून १९ तोळे सोने लंपास | पुढारी

Miraj : मिरजेत भरदिवसा बंगला फोडून १९ तोळे सोने लंपास

मिरज; पुढारी वृत्तसेवा : Miraj : येथील विद्यानगरमध्ये भिमराव रामचंद्र येडूरे यांचा भर दिवसा चोरट्यांनी बंद बंगला फोडून 19 तोळ्याचे दागिने लंपास केले. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. निवृत्त शिक्षक येडूरे हे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता ते आपल्या पत्नीसह बंगल्याला कुलूप लावून आठवडा बाजारात गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाची कुलूप तोडून आत्मध्ये प्रवेश केला. त्या नंतर कपाट फोडून चोरट्याने 19 तोळ्याचे दागिने हातोहात लंपास केले. यामध्ये दहा तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याची चैन, दोन अंगठ्या, कर्णफुले ,ठुशी असा जवळपास 19 तोळ्याचा आठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.

येडूरे दाम्पत्य साडेअकरा वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. कपाटातील स्टीलच्या डब्यातील जवळपास 19 तोळे दागिने लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या बाबत महात्मा गांधी चौक पोलिसांना सदर चोरीची माहिती दिली.

यावेळी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. सदर घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी भेट दिली. याबाबत भिमराव रामचंद्र हिंदूरे यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली असून सदर भरदिवसा घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button