

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी गतविजेत्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सराव सामन्यात चांगलाच चमकला. बुधवारी झालेल्या या सामन्यात मोहम्मद नबीने विंडीजच्या एकापेक्षा एक सरस टी २० चॅम्पियन्सना जखडून ठेवले. अफगाणिस्तानने वेस्ट इंडीज समोर प्रथम फलंदाजी करताना १९० धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर कर्णधार मोहम्मद नबी स्वतः पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्याने सलग चार षटके टाकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
मोहम्मद नबीने चार षटके टाकत फक्त २ धावा देत ३ बळी टिपले. विशेष म्हणजे त्याने एक निर्धाव षटकही टाकले. त्याने आपल्या स्पेलमधील २४ चेंडूपैकी २२ निर्धाव चेंडू टाकले. त्याच्या गोलंदाजीवर दोन टी २० वर्ल्डकप जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजला फक्त २ एकेरी धावा घेता आल्या. नबीची ही कामगिरी सराव सामन्यातील असल्याने हे अधिकृत रेकॉर्डवर येत नाही.
मोहम्मद नबीच्या या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा चायनामन गोलंदाज तबरैज शामसीने एक ट्विट केले आहे. त्याने अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे.
तो ट्विटमध्ये म्हणतो की, 'बर आता एका गोलंदाजाला टी २० मध्ये ४ षटकात १ धाव देण्यासाठी किती दशके लागणार आहेत. मोहम्मद नबीच्या ४ षटाकात २ धावा आणि ३ विकेट घेण्याचा विक्रम कधी मोडणार? कृपा करुन दुसऱ्या गोलंदाजांना संधी द्या अध्यक्ष महोदय.'
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १८९ धावसंख्या उभारली. हजरतुल्ला झाजाई आणि मोहम्मद शाहझाद या दोघांनी अर्धशतके ठोकली. मोहम्मद नबीने अफगाणिस्तानकडून ८० टी २० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७२ विकेट घेतल्या आहेत आणि १३६६ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानचा पहिल्या सुपर १२ मधील सामना २५ ऑक्टोबरला शारजात ग्रुप बी मधील पहिल्या क्रमांकाच्या संघाबरोबर होणार आहे.