सांगली: शिराळा येथे २ हजारांच्या बनावट नोटा; महिलेला अटक | पुढारी

सांगली: शिराळा येथे २ हजारांच्या बनावट नोटा; महिलेला अटक

शिराळा; पुढारी वृत्तसेवा: शिराळा शहरात २ हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी मच्छिंद्रनाथ विनायक पवार यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर एका महिलेला अटक करण्यात आली आहे. सविता सुरेश लोकरे (रा. पाडळेवाडी) असे महिलेचे नाव आहे.

याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजता सविता सुरेश लोकरे यांनी आयसीआयसीआय बँकेमध्ये 50 हजार रुपयांचा भरणा केला. त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या तेरा नोटा होत्या. या तेरा नोटा बँकेने तपासल्या असता बनावट असल्याचे आढळून आले. या बाबतची फिर्याद शिराळा पोलिसांत दिली असून सविता सुरेश लोकरे या महिलेस अटक केली आहे. बनावट चलनी नोटांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर करीत आहेत.

नागरिक २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करू लागलेले आहेत. तर शहरात दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बनावट नोटा आल्या कोठून हे शोधण्याचे आवाहन पोलिसांपुढे उभे राहिले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केलेले आहे.

हेही वाचा 

Back to top button