सांगली: अखेर विट्यातील 'बोकड बळी' प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली: अखेर विट्यातील 'बोकड बळी' प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

विटा: पुढारी वृत्तसेवा: अखेर विट्यातील ‘रस्त्यावर बोकड बळी’ प्रकरणी संशयित संजय जरग त्याचा साथीदार आणि संबंधित मांत्रिक (तिघेही रा. विटा, जि. सांगली) अशा तिघांवर विटा पोलिसांत आज (दि. २३) गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांच्या फिर्यादीवरून अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झालेल्या अपघातातून लवकर बरे व्हावे, म्हणून बोकडाचे मुंडके आणि दोन पाय शिवाय नारळ, रोट्या, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली आदी साहित्य विटा- कराड महामार्गावर टाकले होते. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आणि सांगली जिल्ह्याच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारी ही घटना विट्यात घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.

१६ मेरोजी रात्री ९ च्या सुमारास राजेंद्र सोमू राठोड यांच्या मालकीच्या जमीन गट नं. २२७ मधील हॉटेल शिवार शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये एक बोकड कापून तेथे मुंडके व दोन पाय ठेवले होते. त्याच्या शेजारी एका कागदावर नारळ, दामटा, तांदूळ, देशी दारूची बाटली, काजळ, लिपस्टीकची डब्बी, गांजा, दवाखान्याची चिठठी, लिंबू, हळद व कुंकू ठेवून तेथे पूजा केल्याचे दिसत होते. याचे विवेक भिंगारदेवे यांनी घटनास्थळी जाऊन मोबाईलमध्ये शुटींग केले. त्यानंतर तेथे प्रशांत प्रल्हाद कांबळे, प्रशांत राठोड व इतर लोक आले.

याबाबत माहिती घेण्यासाठी राजू राठोड यांनी संजय जरग यांच्याशी संपर्क केला असता याठिकाणी माझा चार वर्षापूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी मला एका मांत्रिकाने अपघात झालेल्या ठिकाणी बोकडाचा बळी देवून उतारा द्या, असे सांगितले. त्यामुळे आपण रस्त्यावर बोकडाचा बळी दिला असल्याचे जरग यांनी सांगितले. तसेच तुम्ही पोलिसांत तक्रार केली, तर हात- पाय मोडून टाकेन, जिवंत सोडणार नाही, अशी दमदाटीही जरग याने केली. या फिर्यादीवरून संजय जरग, त्याचा साथीदार आणि संबंधित मांत्रिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा 

Back to top button