सांगली : ‘करणी’वर मानसोपचार अन् बुवांना धाक हवा | पुढारी

सांगली : ‘करणी’वर मानसोपचार अन् बुवांना धाक हवा

सांगली, गणेश मानस : अचानक एखाद्या व्यक्तीचे डोळे पांढरे होतात, दातखिळी बसते, हातपाय थरथरू लागतात. अंधारातून चालत येत असताना अचानक वाचा जाते, हातपाय लुळे पडतात. घरातील एखाद्या महिलेला अंधार्‍या खोलीची भीती वाटून ती विचित्र वागायला लागते. कॉलेजला जाणारा तरुण अचानक घरात गप्पगप्प बसू लागतो. नुकतीच लग्न झालेली मुलगी जोरजोराने आरडाओरडा करीत पती, सासर्‍याच्या अंगावर धावून जाते. कोणाला भास होऊ लागतात. एकना अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यावर हुकमी उपाय म्हणून ‘बाहेरची बाधा’ असे सर्रास निदान केले जाते. वास्तविक पाहता ही सर्व मानसिक आजाराची लक्षणे आहेत. परंतु, डॉक्टरकडे न जाता ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकही एखाद्या महाराजाकडे जातात आणि त्यानंतर सुरू होतो जीवघेणा खतरनाक खेळ!

मानसिक आजाराची लक्षणे दिसणारी व्यक्ती बुवा, महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर त्याचे निदान करणी झालेली आहे, बाहेरची बाधा आहे, भुताने झपाटलेले आहे, कोणीतरी खायला घातलेले आहे, असे केले जाते. त्यानंतर अंगारे-धुपारे देण्यापासून काठीने मारहाण करणे, महिलांच्या अंगाला स्पर्श करणे, लैंगिक शोषण, आर्थिक शोषण तसेच एखाद्याला बळी देणे असे उपाय सुचविले जातात. करणी केेलेली आहे, असे सांगून करणी करणार्‍यांचे नाव जाहीर केले जाते. त्यातूनच मग सुडबुद्धीने खुनासारख्या घटना घडतात. अंधश्रद्धेच्या या प्रकारातून दिल्लीजवळ बुराडी येथील संतनगर येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2017 मध्ये घडली होती. या सर्व घटनांमागे मानसिक आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मानसिक आजाराची ओळख हवी

बुवा, महाराजांकडे जाणारे रुग्ण हे मानसिक आजाराने ग्रस्त असतात. यातील सौम्य मानसिक विकार हे बुवा-महाराजांच्या केवळ ‘सूचने’ने बरे होतात. स्किझोफ्रेनिया, अक्यूट मॅनिया, हिस्टेरिया, डिप्रेशनवर योग्य उपचारच आवश्यक असतात.

परभणीत पहिले करणी-भानामती उपचार केंद्र

परभणी येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जगदीश नाईक म्हणाले, पुणे येथे ससूनमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर परभणी येथे काम सुरू केले; परंतु या ठिकाणी अशिक्षितांबरोबर सुशिक्षित असलेली मंडळीही करणीच्या भीतीखाली वावरत होती. त्यांना वैद्यकीय भाषेत समजावून सांगणे कठीण जाऊ लागले. करणीच्या भीतीपोटी विदर्भ-मराठवाड्यात अनेकांचे बळी गेल्याच्या घटना वाचनात येत होत्या. या लोकांना बाहेर काढण्यासाठी अंनिसच्या मदतीने महाराष्ट्रातील पहिले करणी-भानामती उपचार केंद्र सुरू केले. त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करून त्यांना त्यांच्या समस्येतून बाहेर काढले जाते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Back to top button