चंद्रकांत पाटील PM मोदींचाही एकेरी उल्लेख करत असावेत; जयंत पाटलांचा टोला | पुढारी

चंद्रकांत पाटील PM मोदींचाही एकेरी उल्लेख करत असावेत; जयंत पाटलांचा टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘सत्ता गेल्यानंतर काही लोकांमध्ये भ्रमिष्टपणा येतो, तर काही लोकांचा तोल जातो. चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत यातले काय झाले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणात एकेरी भाषा वापरणे ही महाराष्ट्रची संस्कृती कधीच नव्हती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी एकेरी भाषा वापरली, हे दुर्दैवी आहे. असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर लगावला.

शरद पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. मग चंद्रकांत पाटील तरी शरद पवारांना एकेरी भाषा कसे वापरू शकतात ? बहुतेक चंद्रकांत पाटील हे खासगीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पण एकेरी भाषा वापरत असावेत. त्यांना तशी सवय असावी,’ असं मंत्री पाटील यांनी म्हटलं. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यात जयंत पाटील यांनीही उडी घेतली आहे. मंत्री पाटील सांगलीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

गृहमंत्री पद का नाकारले? जलसंपदा मंत्री पाटील यांनी केला खुलासा

सांगलीतील विश्रामबाग येथे नतून पोलिस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्रीपद का नाकारले याचा खुलासा केला.

आर आर पाटील यांना मी एकदा गृहखात कसं आहे विचारले तेव्हा आबांनी मला बीपी आणि शुगरची गोळी सुरु आहे का विचारले. मी अजिबात नाही असं म्हटलं. यावर आबांनी मला गृहखात घ्या मग सुरु होईल, असा सल्ला मला आर आर आबांनी त्यावेळी दिल्याचा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दमदाटी करण्यासाठी जाऊ नये, तर पोलिसांना पाठबळ देण्यासाठी जायला पाहिजे. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. पोलिसांचे मनोध्यर्य वाढवावे लागेल. राजकीय नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यावे लागेलं. असा सल्लाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय नेत्यांना दिला.

हेही वाचलत का?

Back to top button