यावर्षीही सांगली, कोल्हापूरला मोठ्या महापुराची भीती! | पुढारी

यावर्षीही सांगली, कोल्हापूरला मोठ्या महापुराची भीती!

विटा : विजय लाळे : सध्याचा कोयना आणि वारणा या दोन्ही धरणांमधला पाणीसाठा लक्षात घेता यावर्षीही सांगली, कोल्हापूर शहरांत मोठा महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत स्पष्ट इशाराच कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने महाराष्ट्र शासनाला दिला आहे.

सांगली आणि कोल्हापूर शहरातील महापुराबाबत सन २००५ आणि २०१९ चा अनुभव पाहता सरकारी अधिकाऱ्यांचे मोठ्या धरणांतील पाणी सोडण्याचे गैर व्यवस्थापनच जबाबदार आहे. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोयना आणि वारणा या दोन्ही धरणांमधील पाणीसाठा हा सध्या अतिरिक्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात कृष्णा, वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या काठावरील वसाहतींना महापुराचा शंभर टक्के धोका आहे. असा स्पष्ट इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने महाराष्ट्र शासनाला दिला आहे. या समितीत निमंत्रक म्हणून सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ आणि प्रमोद माने यांचा समावेश आहे.

सध्या कोयना धरणामध्ये ३९ टीएमसी पाणी आहे. दरवर्षी ६७ टीएमसी पाणी पश्चिमेकडे वळवून वीजनिर्मिती करण्यासाठी परवानगी आहे. आजअखेर ५९ टीएमसी पाणी वळवून त्याचा वीज निर्मितीसाठी वापर करण्यात आला आहे. १५ जूनपर्यंत या धरणातील जास्तीत जास्त ८ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरता येईल. तसेच १५ जूनपर्यंत सर्व सिंचन योजना तसेच औद्योगिक वापर आणि पिण्यासाठी ७ टीएमसी पाण्याचा जास्तीत जास्त वापर होईल. तसेच कर्नाटकसाठी १ टीएमसी पाणी सोडले जाईल. सध्या कोयना धरणातून अहोरात्र २ हजार १०० क्युसेक्स पाणी सोडले तरी ते पूर्वेकडे वळवता येणार नाही. त्यामुळे १५ जून अखेर कोयना धरणामध्ये २३ टीएमसी पाणी शिल्लक राहील अशी स्थिती आहे. वास्तविक त्यावेळी या धरणामध्ये ११ टीएमसी पाणी शिल्लक राहणे आवश्यक आहे. परंतु १२ टीएमसी पाणी हे अतिरिक्त राहणार असल्यामुळे महापुराचा धोका निश्चित आहे. हे अतिरिक्त राहणारे १२ टीएमसी पाणी पश्चिमेकडे वीजनिर्मितीकडे वळवले. तर शासनाला सहा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. खाजगी कंपन्यांकडून वीज घ्यावी लागणार नाही. १२ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरले गेल्यास कोयना धरणात १५ जूनअखेर ११ टीएमसी पाणीच शिल्लक राहील. तो जलसाठा केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार असेल; परंतु हे १२ टीएमसी पाणी विजनिर्मितीसाठी वापरले गेले नाही तर मात्र पाण्याचा साठा अतिरिक्त होऊन महापुराचा धोका संभवतो. त्याचवेळी वारणा धरणामध्येही सध्या २०.१४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. जर १ हजार १०० क्युसेक्स पाणी सोडले तर ३ टीएमसी पाणी वापरले जाईल. त्यामुळे १६ टीएमसी पाणी हे १५ जून पर्यंत धरणामध्ये शिल्लक राहील.

केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वारणा धरणामध्ये १५ जूनअखेर जास्तीत जास्त ७ टीएमसी पाणी शिल्लक राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातून राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात पुढे विसर्ग सोडला जातो. या ठिकाणी होणाऱ्या विसर्गापेक्षा ज्यादा ३० हजार क्यूसेक्स विसर्ग अलमट्टी धरणातून सोडला तरच कृष्णा, पंचगंगा आणि वारणा काठावर महापूर येणार नाही. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची १ जूनपूर्वी सांगली येथे बैठक घेऊन कोयना, वारणा, अलमट्टी, हिप्परगी आणि अन्य सर्व संबंधित धरणांचे परिचलन आणि विसर्ग याबाबत काही निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे. तसे निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा महापूराची गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही या समितीने दिला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button