सांगली : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला कंटेनरची धडक; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी | पुढारी

सांगली : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला कंटेनरची धडक; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

जत (सांगली) : पुढारी वृत्तसेवा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला भरधाव कंटेनरने धडक दिल्‍याने पती जागीच ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जत शहरातील जत-विजापूर रस्त्यावर डॉ. तांबोळी यांच्या हॉस्पिटलसमोर भीषण घटना घडली आहे. सतीश गेनाप्पा शिंदे,( वय ३२) रा. सातारा रोड, जत असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी गंभीरित्या जखमी झाली आहे. गुरुवार दि. 27 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीवरून, शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गाने अनेकांचे बळी घेतले आहेत. महामार्गावर कोठेही फलक लावले नाहीत. तसेच शहरातील दुभाजकाचा प्रश्न अद्याप सोडविला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर अर्धवट कामे आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. जत शहरातून जाणाऱ्या वाहनावर वेग-मर्यादा लावण्यात आली नसल्यामुळे अनेक वाहने अत्यंत बेदरकार व भारघावपणे चालविली जातात. त्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

दरम्‍यान, गुरुवार सकाळी साडेपाचच्या सुमारास सतीश शिंदे व त्याची पत्नी हे विजापूर रोड वरून मॉर्निंग वॉकसाठी गेले होते‌. परत येत असताना या दांपत्याला विजापूर होऊन साताऱ्याकडे निघालेल्या भरघाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या दोघांनाही रस्त्यावरून फरपटत पुढे नेले. कंटेनरची जोराची धडक बसल्यामुळे सतीश हा जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शरद पवार हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला त्याचे आशीर्वाद ड्रायक्लीनर्स नावाचे इस्त्री व ड्रायक्लीनचे दुकान आहे. या घटनेमूळे परिसरात हळहळ व्यक्‍त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

-हेही वाचा 

शेतीच्या वादातून सावत्र भावा-बहिणींची एकमेकांना मारहाण

नाशिक शहरात वसाहती झाल्या मोठ्या, रस्ते झाले छोटे!

Pranali Bhalerao प्रणालीच्या या फोटोंवर चाहते म्हणतायेत ‘आता बांधकाम पडतंय’ …

Back to top button