यशवंत कारखाना विकत घेण्यासाठी शिंदे गटाशी युती; संजय विभूतेंचा विश्वजीत कदम यांच्यावर निशाणा | पुढारी

यशवंत कारखाना विकत घेण्यासाठी शिंदे गटाशी युती; संजय विभूतेंचा विश्वजीत कदम यांच्यावर निशाणा

विटा : पुढारी वृत्तसेवा : नागेवाडीचा यशवंत कारखाना तुम्हाला विकत घ्यायचा आहे, त्या प्रकरणात आमदारांची नाराजी नको, म्हणून तुम्ही शिंदे गटाशी साटेलोटे केले, असा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी माजी मंत्री व काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यावर केला.

विटा मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कदम गटाने शिंदे गट (शिवसेना) आणि भाजपबरोबर युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे. याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी आमदार कदम यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

विभूते म्हणाले, विटा मार्केट कमिटीमध्ये काँग्रेसचा कदम गट नेहमीच आमदार बाबर आणि भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाबरोबर राहिलेला आहे. परंतु राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य समविचारी पक्षांच्या बरोबर आमचा पक्ष अशी महाविकास आघाडी आहे. आमचे कॉमन विरोधक भाजप आणि शिंदे गट आहेत. त्यामुळे या पुढील सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सोडून भाजप आणि शिंदे गटाबरोबर युती करू नये, असे स्पष्ट लेखी आदेशच दिलेले आहेत.

त्यामुळे आम्ही सांगली जिल्ह्यात मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र रहावेत, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील होतो. परंतु विटा मार्केट कमिटीमध्ये काँग्रेसचा कदम गट हा बाबर यांच्या गटाबरोबर गेल्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विश्वजीत कदम यांना माझा सवाल आहे, ज्यांनी तुमचे मंत्रिपद घालवले, सरकार घालवले, त्या शिंदे गटाबरोबर तुम्ही कसे गेलात? तुम्ही राज्याचे नेते होतात, पण तुम्हाला या निवडणुकीमुळे तालुक्याचे नेते होण्याची नामुष्की आली आहे.

या तालुक्यातील काँग्रेस आमदारांच्या दावणीला कायमच बांधलेली आहे. त्यातून बाजूला जाण्याची संधी तुम्ही घालवलीत. विट्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली लढायचे ठरविले होते. परंतु, तुम्ही केवळ व्यक्तिगत स्वार्थ पाहून वेगळा निर्णय घेतलात. परंतु हे आम्हालाच नव्हे, तर काँग्रेसच्या मतदारालाही पटलेले नाही, अशी टीकाही विभूते यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button