सांगली: 'यशवंत साखर' आंदोलनातील कामगार अत्यवस्थ | पुढारी

सांगली: 'यशवंत साखर' आंदोलनातील कामगार अत्यवस्थ

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यात तब्बल ७२ दिवस आंदोलनास बसलेल्या यशवंत साखर कामगारांपैकी एक कामगार आज (दि.१४) अत्यवस्थ झाला. अमृत यशवंत लोंढे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

विटा तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत देण्यासाठी ७३ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. सांगली जिल्हा बँकेने कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले. त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण ८ कोटी २८ लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. जिल्हा बँक या कामगारांचे पैसे गेले २०-१२ वर्षे बिन व्याजी वापरत आहे. ते परत मिळावेत म्हणून १ फेब्रुवारीपासून या कामगारांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनाचा काल गुरूवारी ७२ वा दिवस होता. काल संध्याकाळपासून वाळूज येथील रहिवासी अमृत लोंढे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या सहकारी कामगारांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले. मात्र, त्यांना पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे आंदोलकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा 

Back to top button