सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट | पुढारी

सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट

विटा, पुढारी वृत्तसेवा : विटा मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप बरोबर काँग्रेसच्या कदम गटाची युती झाली. तर ठाकरे गटाने निवडणुकीतून माघार घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. सांगली जिल्ह्यात सांगलीसह विटा, तासगांव, पलूस, आटपाडी या चार मार्केट कमिट्याच्या निवडणुका होत आहेत. यात बहुचर्चित खानापूर आणि कडेगाव तालुक्याची मिळून असलेल्या विटा मार्केट कमिटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कारण गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या तिघांची एकत्रित सत्ता आहे. परंतु, गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ घडली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट शिवसेना आणि महाविकास आघाडीत कमालीचे राजकीय वैरत्व निर्माण झाले आहे. त्यामुळे विटा मार्केट कमिटी निवडणुकीत नेमके काय होणार? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा कदम गट यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झडत होत्या.

मात्र कदम गटाचे नेते आमदार मोहनराव कदम यांच्या नंतर या गटाची धुरा वाहणाऱ्या माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी आपली जुनीच मैत्री कायम ठेवल्याचे दिसत आहे. त्यांनी चक्क शिवसेना आणि भाजप यांच्याबरोबर युती करून केली आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून जिल्हयातील सर्व मार्केट कमिटयांच्या निवडणुकीतून ठाकरे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग लागला आहे. आज अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी सकाळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी समर्थकांसह दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे गटावर अन्याय केला आहे. असा आरोप करीत जिल्ह्यातील सर्व उमेदवारांची माघार घेतली. स्वत: जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी विटा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला.

हेही वाचंलत का?

Back to top button