सांगली: विटा येथे ‘यशवंत’ प्रश्नी सोमवारी रास्ता रोको आंदोलन | पुढारी

सांगली: विटा येथे 'यशवंत' प्रश्नी सोमवारी रास्ता रोको आंदोलन

विटा : पुढारी वृत्तसेवा : यशवंत साखर कामगारांच्या थकीत देणी देण्याबाबत सांगली जिल्हा बँकेचे धोरण वेळकाढू आणि कामगार हितविरोधी आहे, असा आरोप करत येत्या सोमवारी (दि. ६) रास्ता रोको- चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा शेकाप, शेतकरी सेना आणि श्रमिक संघटनेच्यावतीने आज (दि.१) देण्यात आला आहे.

विटा च्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत देणीबाबत सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले. त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून तत्कालीन एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे ८ कोटी २८ लाख रुपये जिल्हा बँकेने देणे गरजेचे होते. मात्र, हे कायदेशीर आणि न्याय देणे या बँकेत आजही पडून आहे. कामगारांनी अनेक वेळा या पैशांची मागणी करुनही बँक त्यांना दाद देत नाही. त्या वेळेपासून जिल्हा बँक कामगारांचे पैसे बिनव्याजी वापरत आहे. शिवाय पैसे देण्यात वेळकाढूपणा करीत आहे.

शेवटी सर्व प्रकारे अर्ज विनंत्या करुनही बँक दाद देत नाही. म्हणून १ फेब्रुवारीपासून या कामगारांनी अव्याहतपणे धरणे आंदोलन करून निर्णायक लढा सुरु केला आहे. या आंदोलनास शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी सेना , श्रमिक कष्टकरी संघटनेसह परिसरातील हणमंतवडीये, भाळवणी, कळंबीसह अनेक गावच्या सरपंचांनी पाठिंबा दिला आहे. आज दुपारी आंदोलस्थळी अॕड. भाई सुभाष पाटील, भाई संपतराव पवार , शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे, श्रमिक संघटनेचे गोपाळ पाटील यांनी सभा घेऊन पाठिंबा दिला. तसेच येत्या सोमवारी येथील मुख्य चौकात मोर्चा काढून विट्यात रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घोषित केला.

हेही वाचा 

Back to top button