सांगली : जतमधील पत्रकार गणेश बागडे यांचा खूनच; तिघांना अटक | पुढारी

सांगली : जतमधील पत्रकार गणेश बागडे यांचा खूनच; तिघांना अटक

जत; पुढारी वृत्तसेवा : उमदी (ता. जत ) येथील पत्रकार गणेश सिद्धाप्पा बागडे (वय ३५, रा. विठ्ठलवाडी, उमदी) यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी यापूर्वी वसंत होनमुखे यांनी जीवन संपवल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परंतू सोमवारी मयत बागडी यांच्या कुटुंबियांनी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. यानंतर पोलिसांनी जीवन संपवल्याचा प्रयत्न नसून हा खू असल्याचे सांगितले. त्यानुसार आणखी दोन आरोपींचा समावेश करत एकूण तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यामध्ये वसंत होनमुखे, राजू होनमुखे व सुभाष गवळी (सर्व रा. उमदी, ता. जत) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. असून त्यांना जत न्यायालयात हजर केले असता त्या तिघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संशयित आरोपी वसंत होनमुखे याने पैशाच्या देवाण घेवाणीतून गणेश बागडी याला वारंवार त्रास दिल्याने त्याने विहिरीत पडून जीवन संपवल्याची फिर्याद मयत गणेशच्या आईने उमदी पोलिसात दिली होती. ही घटना २४ मार्च रोजी घडली होती. पोलिसांनी होनमुखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, गणेश याचा खून झाला असून त्याच्या खुनाचा तपास योग्यपद्धतीने व्हावा, आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करावी. उमदी पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे, याची गंभीर दाखल घ्यावी, अशी मागणी मयत गणेश याच्या कुटुंबियांनी पालकमंत्री सुरेश खाडे व पोलिस प्रमुख बसवराज तेली यांच्याकडे केली होती. मात्र, आज सोमवारी जत प्रांत कार्यालयासमोर कुटुंबियांनी संपूर्ण कुटुंबियांसह आमरण उपोषण सुरु केले होते.

यावेळी उमदी पोलिसांनी या घटनेतील आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून हे आमरण उपोषण मागे घ्यावे, यासाठी लेखी पत्र दिले आहे. यानंतर मयत गणेश याच्या कुटुंबियांनी उपोषण मागे घेतले आहे. यामध्ये त्यांची पत्नी लक्ष्मी गणेश बागडे, विलास शिंदे, शकुंतला शिंदे, वडील बसवराज कोडते, आई शालाबाई कोडते, मयताची मुले श्रेयस, श्रेया, हे उपोषणात सहभागी झाले होते. या खुनाचा तपास उमदी पोलिस करत आहेत.

घटने दिवशीच खुनाची चर्चा

२४ मार्च रोजी गणेश बागडे यांची काही संशयित आरोपी सोबत रात्री ११ वाजता वादावादी झाल्याची चर्चा सुरू होती.२५ मार्च रोजी बागडे यांचा मृतदेह विहिरीतून रेस्क्यू टीमच्या साह्यायाने बाहेर काढण्यात आला. यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. बागडे यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचे सुरुवातीस भासवण्यात आले होते नंतर जीवन संपवण्यासाठी प्रयत्न प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

मयत गणेश बागडे यास जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती बागडे यांचा खूनच आहे असे निष्पन्न झाले आहे .यात अन्य दोघा आरोपीचा समावेश असल्याने तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस योग्य दिशेने तपास सुरु आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आरोपीना योग्य ती शिक्षा मिळेल.
पंकज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, उमदी पोलीस ठाणे

Back to top button