

सांगली : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील खासगी आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून दिल्या जाणार्या बीएएमएस प्रवेशाकरिता मागील वर्षांपेक्षा पाचपट शुल्कवाढ लागू केली आहे. अभ्यासक्रमांचे नियमित शुल्कही अद्याप निश्चित नाही. पाचपट शुल्कवाढीचा निर्णय झाल्यास व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 45 ते 60 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे शुल्क नियामक प्राधिकरणाच्या आदेशापूर्वीच याची अंमलबजावणी सुरू केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
खासगी महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यातील अभ्यासक्रम शुल्कामध्ये वाढ करताना शुल्क नियामक प्राधिकरणाचे शुल्क वाढीसंदर्भात आदेश होणे महत्त्वाचे असते. अशा स्थितीत अद्याप प्राधिकरणाने कोणतेही लेखी आदेश काढलेले नसताना पाचपट शुल्क मंजूर होणार हे गृहित धरून महाराष्ट्रातील बहुतांश आयुर्वेद महाविद्यालयांनी पाचपट शुल्कवाढ केली आहे. वास्तविक शासनाने आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालांच्या शुल्कामध्ये पाचपट वाढ करावी म्हणून शुल्क नियामक प्राधिकरणास पत्र पाठविले आहे. प्राधिकरणाने त्यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. अशा स्थितीत शुल्कवाढीचा निर्णय गृहित धरून पाचपट अधिक शुल्क मागणी महाविद्यालयांकडून सुरू झाली आहे.
एकीकडे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या फेरीचा निकाल समोर आला आहे. पहिल्या फेरीत 10 ते 12 सप्टेंबरपर्यंत पसंतीक्रम भरण्याची मुदत होती. ती भरल्यानंतर 13 तारखेला शासनाने फीवाढीची शिफारस प्राधिकरणाला केली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा गोंधळ झाला आहे.
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने 13 सप्टेंबरला शुल्क नियामक प्राधिकरणाला पत्र पाठविले. खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संस्थात्मक कोट्याच्या (एनआरआयसह) शुल्कात पाचपट वाढ करण्यास हरकत नाही, असे त्या पत्रात म्हटले आहे. या पत्राचा आधार घेत महाविद्यालयांनी वाढीव शुल्क मागणी सुरू केली आहे.