

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 39 बीएएमएस च्या डॉक्टरांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कार्यमुक्त केले. त्यामुळे डॉक्टरांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2019 पासून कार्यरत असलेले व कोरोना महामारीमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या तदर्थ बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकारी यांना कार्यमुक्त करू नये यासाठी शासनाकडे निवेदने पाठविण्यात आली आहेत. तरीही डॉक्टरांना कार्यमुक्त केले आहे.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑगस्ट 2019 पासून तदर्थ वैद्यकीय अधिकारी (गट-अ) या पदावर बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या निुयक्तीनंतर जागतिक कोरोनाच्या महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व शासकीय कामकाज केले. पाच-पाच महिने नियमीत पगार नसतानाही आंदोलन न करता या डॉक्टरांनी रूग्णाची सेवा केली.
मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य संस्थामधील वैद्यकीय अधिकारी रिक्त पदासंबधित माहिती देण्याविषयी प्रत्येक जिल्हास्तरावर सुचना देण्यात आल्या होत्या. या सूचनेप्रमाणे जिल्हा स्तरावरून बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी हे कार्यरत असूनसध्दा त्या पदाच्या ठिकाणी रिक्त पद दाखविले गेले. त्यामुळे या वैद्यकीय अधिकारी यांचे जागी बॉडेड एम.बी.बी.एस. अधिकारी यांची भरती केली जात आहे. यामुळे बी. ए. एम. एस. तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. बी. ए. एम. एस. पदविधारक तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांचे स्वतंत्र केडर निर्माण करून शासकीय सेवेत समावेश करण्याची मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे सध्या डॉक्टर चकरा मारत आहेत.