Women Maharashtra Kesari Sangli | सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आक्रमक हल्ला करून प्रतिस्पर्ध्याला चित करीत पहिल्या महिला ‘महाराष्ट्र केसरी’चा मान सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने मिळविला. कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपट करीत प्रतीक्षा महाराष्ट्र केसरी झाली आणि मैदानात एकच जल्लोष झाला. या जिगरबाज मुलीने सांगली नगरीला मानाची चांदीची गदा मिळवून दिली आणि सांगलीच्या कुस्ती क्षेत्रात आपले नाव कोरले.
प्रतीक्षा ही सांगली जिल्ह्यातील तुंग येथील असून तिला 51 हजार रुपये रोख आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली. तिचे वडील सांगली पोलिस दलात कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याचा मान सांगलीला मिळाला आणि महाराष्ट्र केसरीची चांदीची गदाही सांगलीलाच मिळाली. आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत प्रतीक्षा आणि वैष्णवी पाटील या दोघी महाराष्ट्र केसरीसाठी आमने-सामने आल्या होत्या. चांदीची गदा कोण मिळविणार आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता ताणली होती. या कुस्तीसाठी मैदान खचाखच भरले होते.
प्रतीक्षा पहिल्यापासूनच आक्रमक होती. तिने आक्रमक पवित्रा घेत पहिल्यांदा दोन गुण मिळवले. यातून सावरायच्या आतच तिने पुन्हा वैष्णवीवर जोरदार चाल करीत उचलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुन्हा दोन गुण मिळाले. त्यानंतर वैष्णवीने प्रतीक्षाला पटात घेतले आणि क्षणात वरती उचलून खाली आपटले. वैष्णवीला एकदम चार गुण मिळाले आणि मैदानात शांतताच पसरली, पण या कसोटीच्या क्षणी भान ठेवत प्रतीक्षा आक्रमण करीत राहिली. तिने पुन्हा एकदा निर्णायक चढाई करीत गुण मिळवले. अखेर प्रतीक्षाने वैष्णवीवर मात करून चांदीची गदा पटकावली.
राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. जितेश कदम, जयश्री मदन पाटील यांच्या हस्ते प्रतीक्षा बागडी हिला मानाची गदा प्रदान करण्यात आली. यावेळी हणमंतराव जाधव, गणेश मोहिते, संगीता खोत, संभाजी वरुटे, संपत साळुंखे, उत्तमराव पाटील, प्रतापराव शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक वस्ताद, कुस्तीशौकीन उपस्थित होते.
माझ्या मतदारसंघातील तुंग येथील महिला कुस्तीपटू प्रतीक्षा रामदास बागडी हिने आज कल्याणच्या वैष्णवी पाटील यांना चितपट करीत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन. प्रतीक्षा ही कासेगाव शिक्षण संस्थेच्या कुसुमताई पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूरची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील सांगली पोलिस दलात कार्यरत असून त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या मुलीला घडविले. तिला पैलवान बनविले. आज प्रतीक्षा हिने वडिलांच्या कष्टाचे चीज केले. प्रतीक्षा, आपले हे यश अनेक मुलींना प्रेरणा देणारे ठरणार आहे.
– आ. जयंत पाटील
हे ही वाचा :
- 1st Women Maharashtra Kesari : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सांगलीत सुरुवात
- मोठी बातमी: सांगलीत रंगणार महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा, 45 जिल्ह्यांतून स्पर्धकांचा सहभाग