मोठी बातमी: सांगलीत रंगणार महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा, 45 जिल्ह्यांतून स्पर्धकांचा सहभाग | पुढारी

मोठी बातमी: सांगलीत रंगणार महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा, 45 जिल्ह्यांतून स्पर्धकांचा सहभाग

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आणि सांगली जिल्हा व शहर तालीम संघाच्या वतीने पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सांगली येथे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही स्पर्धा सांगली येथे दि 23 आणि 24 मार्च रोजी होणार असून दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील मल्ल सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.

या स्पर्धेबरोबर कोल्हापूर येथे दि 25 आणि 26 मार्च रोजी कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होणार आहे. तर वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा दि 27 व 28 मार्च रोजी कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र येथे अमोल बुचडे आणि अमोल बराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही लांडगे यांनी यावेळी दिली.

कोथरूडची महाराष्ट्र केसरी अनाधिकृतच

कोथरूड येथे झालेली कुस्ती स्पर्धा ही निमंत्रीतच होती. त्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा ‘किताब म्हणता येणार नाही. याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्र शासनाला ही प्रतिवादी करण्यात आले आहे. परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

Back to top button