

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याचा सर्वत्र अपूर्व उत्साह असून, उत्सवाचे जल्लोषी वातावरण आहे. नववर्षाच्या प्रारंभीच अनेक नवनव्या उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत अपार उत्साह आहे. वाहने, सोने-चांदी, स्थावर मालमत्ता, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे. खरेदीसाठी अनेक कंपन्या व विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण-तरुणींनी जय्यत तयारी केली असून, पारंपरिक पेहरावात निघणारी नववर्ष स्वागत मिरवणूक आकर्षण ठरणार आहे.
बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी गर्दी होती. चिवा, साखरेच्या माळा, चाफा व कडुलिंबाच्या माळा, फुले खरेदीला गर्दी झाली होती. यंदाचा उत्साह तुलनेत अधिक आहे. बाजारपेठेत झालेल्या गर्दीवरून पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी उलाढाल होईल, असा व्यापारी बांधवांचा अंदाज आहे.
मुहूर्तावर वाहने नेण्यासाठी अनेकांनी आधीपासूनच बुकिंग केले असून, चारचाकी व दुचाकींसह इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल जास्त आहे. विशेषत: युवकांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची जबरदस्त क्रेझ आहे, तर बहुतेकांचा कल पारंपरिक दुचाकी वाहन खरेदी करण्याकडे आहे. अनेक बँकांसह वित्तीय संस्थांकडून सहज उपलब्ध होणार्या कर्जांमुळे वाहन खरेदीचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर अनेक नव्या गृहप्रकल्पांचे भूमिपूजन मुहूर्तावर होत आहे. तसेच पूर्ण झालेल्या गृहप्रकल्पांतील घरांच्या चाव्या पाडव्याच्या मुहूर्तावर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.