सांगली : नदी प्रदूषणाला जयंतरावच सर्वाधिक जबाबदार; पृथ्वीराज पवार यांनी विधानसभेत सांगितले अर्धसत्य | पुढारी

सांगली : नदी प्रदूषणाला जयंतरावच सर्वाधिक जबाबदार; पृथ्वीराज पवार यांनी विधानसभेत सांगितले अर्धसत्य

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा नदी प्रदूषणाला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेच सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यांनी विधानसभेत अर्धसत्य सांगितले. त्यांनी दादा-बापू वादाची धुणी विधानसभेत धुतली, पण जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्थांचे सांडपाणीही नदी प्रदूषणास कारणीभूत आहे. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जयंत पाटील यांनाही पाठवणार आहोत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पवार म्हणाले, जुलै – ऑगस्ट 2022 मध्ये कृष्णा नदीत दोनवेळा मासे मृत्युमुखी पडले. वारणा नदीतही मासे मृत्युमुखी पडले. मौजे डिग्रज, भिलवडी, बहे-बोरगाव, वाळवा, दूधगााव आणि अंकलीजवळ मासे मृत्युमुखी पडले. त्याअनुषंगाने राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली होती. लवादाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. या समितीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निश्चल सी, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अमिता कोलेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगली कार्यालयाचे अधिकारी नवनाथ अवताडे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांचा समावेश होता. समितीने दि. 13 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय हरित लवादाकडे अहवाल सादर केला.
9 पैकी 4 संस्था यांच्याच..!

पवार म्हणाले, समितीच्या अहवालानुसार हुतात्मा दूध संघ, हुतात्मा कारखाना, हुतात्मा डिस्टिलरी, राजारामबापू दूध संघ, राजारामबापू साखर कारखाना, राजारामबापू फॉरेन अ‍ॅण्ड कंट्री लिकर, राजारामबापू डिस्टिलरी, यशवंतराव मोहिते कारखाना तसेच इस्लामपूर नगरपालिका, आष्टा नगरपालिका, सांगली महापालिका तसेच नदीकाठच्या 29 गावांवर नदीप्रदूषणास कारणीभूत असल्याचा ठपका आहे. नदीप्रदूषणास कारणीभूत 9 पैकी 4 संस्था राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आहेत. 29 पैकी 20 गावेही जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आहेत. स्पेंटवॉशच्या शिल्लक साठ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावल्याशिवाय संबंधित संस्थांना परवानगी देऊ नये, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते.

कृष्णा नदी व नदीच्या ईको सिस्टिमचे सर्वाधिक नुकसान राजारामबापू उद्योगातील संस्थांकडून झाले आहे. मात्र विधानसभेत त्यांनी केवळ वसंतदादा कारखाना (दत्त इंडिया), स्वप्नपूर्ती यांचाच उल्लेख केला. खरेतर जयंत पाटील यांनी कृष्णा व वारणा नदीच्या उगमापासून ते राजापूर बंधार्‍यापर्यंत कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सांगणे व त्यासाठी निधी व अनुषंगिक कार्यवाही यासाठी विधानसभेसारख्या राज्यातील सर्वोच्च सभागृहाचा वापर करायला पाहिजे होते, पण विधानसभेत केवळ दादा-बापू वादाची धुणीच धुण्यात धन्यता मानली. त्याचा निषेध आहे, असे पवार यांनी सांगितले.

अहवाल विधानसभेत वाचून दाखवा..!

पवार म्हणाले, दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीवर झालेल्या कारवाईचे स्वागत आहे. पण कृष्णा व वारणा नदी प्रदूषणास जबाबदार कारखाने, डिस्टीलरीसह सर्व संस्थांवर कारवाई झाली पाहिजे. जयंत पाटील हे तीस-तीस वर्षे राज्याच्या सत्तेत राहिले. जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले. मात्र कृष्णा नदी प्रदूषणावर उपाययोजना केली नाही. मिरज एमआयडीसीत सीईटीपी बसवले नाही. मिरज एमआयडीसीचे प्रदूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे.

इस्लामपूर, आष्टा नगरपालिका, सांगली महापालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत ठोस उपाययोजना केल्या नाहीत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला. नदी प्रदूषणास कारणीभूत संस्थांचा अहवाल मुख्यमंत्री तसेच जयंत पाटील यांना पाठवत आहे. हिंमत असेल तर जयंत पाटील यांनी हा अहवाल विधानसभेत वाचून दाखवावा. कृष्णा नदी सर्वाधिक प्रदूषित करणारे मोठे गुन्हेगार कोण, हे महाराष्ट्राला कळू दे.

25 रोजी मानवी साखळी; सीएम कार्यालयावर धडक

पवार म्हणाले, कृष्णा, वारणा नदी प्रदूषणमुक्त करण्यास उपाययोजना राबविण्यासाठी दि. 25 मार्चरोजी कृष्णा नदी तीरावर मानवी साखळी केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयावरही लवकरच धडक मारणार आहोत. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत. न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरील लढाई लढणार आहोत.

Back to top button