Maharashtra unseasonal rains | अवकाळी पावसाचा फटका, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश | पुढारी

Maharashtra unseasonal rains | अवकाळी पावसाचा फटका, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पुढारी ऑनलाईन; राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे, यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. (Maharashtra unseasonal rains)

ऐन होळीच्या दिवशीच अवकाळी पावसामुळे प्रचंड तडाखा बसला. द्राक्ष, गहू , कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान आले आहे. तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडत राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

मराठवाडा- विदर्भ भागांवर मंगळवारपर्यंत वादळी पावसाचे संकट आहे. ७ मार्च रोजी मराठवाडा तसेच विदर्भात गारपिटीची शक्यता आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असलेल्या अवकाळीच्या संकटाने आता निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. अवकाळीचे वातावरण ८ मार्चनंतर निवळेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. दुसरीकडे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, बुलडाणा, पालघर, नगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पाऊस झाला आहे. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा तसेच पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. बागायतदारांचे नुकसान झाले असून, बुलडाण्यातील गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. कांदा, पालेभाज्यांना बाजारात दर नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यात आता अस्मानी संकटाची भर पडली आहे.

धुळे जिल्ह्यात गारपीट; केळीला फटका

शिरपूर (जि. धुळे) तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, हरभरा व इतर पिकांचे नुकसान झाले. हिंगोणीत केळीचे नुकसान झाले. दहिवदला गारपीट झाली. वरझडीत वीज कोसळल्याने २ बैलांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा :

Back to top button