सांगली : ओडिशामधून सांगलीत गांजा तस्करी | पुढारी

सांगली : ओडिशामधून सांगलीत गांजा तस्करी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कवठेपिरान येथे 21 लाखांचा 102 किलो गांजा नुकताच जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता ओडिशातील एकाकडून हा गांजा आला आहे. तो मिरजेतील ‘गुरुजी’ला विकण्यासाठी आल्याचे समोर आले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने ओडिशा येथे गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. तसेच मिरजेतील गांजा तस्कर गुरुजी यालाही अटक केली करण्यात आली.

एलसीबीने कवठेपिरान येथे 22 फेब्रुवारीरोजी छापा टाकून 20 लाख 40 हजारांचा 102 किलोहून अधिक ओला गांजा जप्त केला होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगारांसह पाचजणांना अटक करण्यात आली होती. जप्त केलेला गांजा हा तेलंगणा, आंध्र आणि ओडिशा येथून मिरजेत आणि तेथून संपूर्ण जिल्ह्यात विक्री केला जात आहे.

पथकातील सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तीनही राज्यात सलग पाच दिवस संशयितांचा शोध घेतला. ओडिशा येथील गजपती जिल्ह्यातील मोहाना येथे संशयित कुमार प्रभा लिमा ऊर्फ राजू भाई याचा शोध सुरू केला. संशयित जंगल भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तत्काळ सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी कुमार प्रभा लिमा उर्फ राजू भाई याचा साथीदार संजीब पत्रिक बेहरा याला पाठलाग करून ताब्यात घेतले. संजीव बेहरा याला मोहानी न्यायालयात हजर करून त्याला सांगलीला आणण्यात आले. बोहरा याच्याकडे चौकशी केली असता, ओडिशा राज्यातून सांगली आणलेल्या गांजापैकी मिरजेतील गुरुजी उर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला याला काही किलो गांजा विक्रीसाठी दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मिरजेत छापा टाकून गुरुजी उर्फ मुल्ला याला जेरबंद केले.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, संदीप पाटील, मछिंद्र बर्डे, अमोल ऐदाळे, राहुल जाधव, संकेत मगदूम, आर्यन देशिंगकर, गौतम कांबळे, अजय बेंदरे, कॅप्टन गुंडवाडे यांचा कारवाईत सहभाग होता.

मुख्य सूत्रधार पसारच…

संजीव पत्रिक बेहरा (वय 27, रा. कीर्तिकी, पोस्ट पिंडिकी, जि. गजपती) आणि गुरुजी उर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला (वय 48, रा. दर्गा चौक, मिरज) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गांजा पुरवठा करणारा कुमार प्रभा लिमा उर्फ राजू भाई (रा. ओरिसा) हा पसार झाला आहे.

Back to top button