सांगली : हातनोली ग्रा.पं. बरखास्त करा : ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी, सीईओंना निवेदन | पुढारी

सांगली : हातनोली ग्रा.पं. बरखास्त करा : ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी, सीईओंना निवेदन

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : हातनोली (ता. तासगाव) ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधा-यांचा मनमानी कारभार सुरु आहे. या कारभाराला चाप लावण्यासाठी हातनोली ग्रामपंचायत बरखास्त करा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात सरपंच हिंदूराव जाधव आणि माजी उपसरपंच सुनिल जाधव यांच्यावरही ही गंभीर आरोप केले आहेत.

या निवेदनात म्हटले आहे, सरपंच हिंदुराव भानुदास जाधव यांचे बंधू तथा पोलीस पाटील कृष्णा जाधव, प्रल्हाद शंकर मोहिते यांनी गावात सिटी सर्व्हे नंबर 245 व 236 च्या उत्तरेकडे रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसह गटविकास अधिका-यांकडे तक्रारी अर्ज केला आहे.

माजी उपसरपंच सुनील जाधव यांनी पदाचा गैरवापर करून नमुना नंबर 8 वर फेरबदल करून त्यांच्यासह वडिलांच्या नावे वाढीव जागा लावली आहे. सरपंचासह माजी उपसरपंचांनी सत्तेत येताच पदाचा गैरवापर करुन आणि तसेच ग्रामपंचायत अधिनियमांचा भंग करून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करून जागा ताब्यात घेण्याचे उद्योग चालवले आहेत. ग्रामसेवकावर दबाव आणून वाढीव जागांच्या नोंदी धरलेल्या आहेत.

दुसरीकडे गेल्या १० वर्षापासून आमच्या वहिवाटीत व मालकीच्या असणाऱ्या मिळकत नंबर 173 आणि 174 च्या जागेतील बोअरवेल व कट्टा काढून घेण्याच्या नोटिसा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दिलेल्या आहेत. या अतिक्रमीत जागेवर सरपंचांना कब्जा करायचा असल्यामुळे पदाचा गैरवापर करून व ग्रामसेवकावर दबाव टाकून सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
या अर्जाची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही व्हावी. आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडावी, अन्यथा न्याय मिळावा, यासाठी १५ फेब्रुवारीपासून सांगली जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या निवेदनावर रविंद्र जाधव, अजित जाधव, सतिश जाधव, उत्तम जाधव, बाळासो जाधव, अवधुत जाधव, अंकीत जाधव, अरविंद जाधव, आकाश जाधव, चंद्रकांत जाधव यांच्या सह्या आहेत.

ग्रामपंचायतीने गावातील सर्वच ग्रामस्थांनी केलेली अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबतीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. सदर अतिक्रमणे काढत असताना कुणाचीही गय केली जाणार नाही. या निर्णयामुळे ज्यांची अतिक्रमणे निघणार आहेत, असे ग्रामस्थ खोट्या तक्रारी देत करत आहेत
– हिंदूराव जाधव, सरपंच, हातनोली

हेही वाचा 

Back to top button