मिरज : वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांचा गोपीचंद पडळकर यांच्या बंधूला दणका | पुढारी

मिरज : वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांचा गोपीचंद पडळकर यांच्या बंधूला दणका

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरजेतील वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दणका दिला. जागेवरील मिळकतधारांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी, असा आदेशही तहसीलदार कुंभार यांनी दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी ५१ गुंठे जागा  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विकत घेतल्याचा दावा केला होता. सदर जागेवर मिळकतधारांनी  अतिक्रमणे केली असून ती काढण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर यांनी त्यांच्या टोळीसह चार जेसीबी घेऊन दुकाने रातोरात पाडली होती.

जागा माझीच असून अतिक्रमणे काढण्यासाठी दुकाने पाडली असल्याचा दावा त्यावेळी ब्रह्मानंद पडळकर यांनी केला होता. ब्रह्मानंद यांच्या टोळीने घातलेल्या  राड्यामध्ये एकूण दहा दुकानांचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह टोळीतील शंभर जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

परंतु, पडळकर यांच्या टोळीने घातलेल्या राड्यानंतर मिळकतधारकांकडून जागेवर प्रत्यक्ष कब्जा असण्याचा दावा करण्यात आला होता. घडलेल्या प्रकारानंतर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी  याबाबत सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून पाडलेली बांधकामे जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जागेवरील कब्जा सिद्ध करण्यासाठी तहसीलदार कुंभार यांनी पडळकर व मिळकतधारकांना जागेवरील  कब्जा  सिद्ध करणारी  कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली  होती. यासाठी तीन वेळा सुनावणी देखील घेण्यात आली. यासाठी शुक्रवारी (दि. 20) तहसीलदारांनी अंतिम सुनावणी घेतली. परंतु त्यावेळी देखील पडळकर यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ मागितली होती. यावेळी मात्र तहसीलदार  कुंभार यांनी ही मागणी साफ धुडकावून निकाल देणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार तहसीलदार कुंभार यांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये संबंधित वादग्रस्त जागेवर १७ मिळकतदारांचा कब्जा असल्याचे सिद्ध झाले होते. मिळकतधारांनी  सादर केल्या कागदपत्रावरून  संबंधित जागेवर मिळकतरांचा कब्जा आहे. या आदेशाविरुद्ध पडळकर यांनी न्यायालयात दाद मागावी, असे आदेश देखील तहसीलदार कुंभार यांनी यावेळी दिले. मिळकतधारकांच्या वतीने ॲड. ए. ए. काझी, ॲड. नितीन माने, ॲड. समीर हंगड, ॲड. नागेश माळी यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button