

जत; पुढारी वृत्तसेवा : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची निष्क्रीयता कायमच अधोरेखीत होत आहे. मंगळवारी (दि. २४) पंचायत समितीच्या आवारातूनच तीन लाखांची बॅग चोरट्यांनी भर दिवसा पळवली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चोरीचा तपास करणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील संख येथील ठेकेदार चंद्रशेखर परगोंडा बिरादार हे मंगळवारी जत येथे आले होते. त्यांनी दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांचे सहकारी मित्र आयुब सय्यद यांना पैसे देण्यासाठी येथील एचडीएफसी बँकेतून तीन लाख रूपयांची रोकड काढली होती. पैसे घेवून ते आपल्या चारचाकी गाडीतून पंचायत समितीच्या आवारात गेले. तिथे गाडी लावून ते बोलत उभारले होते. याचवेळी त्यांच्या गाडीतील चालकास फोन आल्याने ते गाडीतून उतरून फोनवर बोलत काही अंतर चालत गेले. तर चंद्रशेखर बिराजदार हे गाडीच्या बाजुलाच मित्रांशी बोलत उभे राहीले होते. अज्ञात चोरांनी याचा पुरेपूर फायदा घेत, बिराजदार यांच्या चारचाकी गाडीतील मागच्या बाजुला ठेवलेली पैशाची पिशवी हातोहात लांबवली.
दोन अज्ञात चोरट्यांनी मोटर सायकल वरून येवून त्यांनी कोणालाही काही समजायच्या आत ही बॅग घेवून पाबोरा केला. विशेष म्हणजे ही घटना पंचायत समितीच्या आवारात घडली तर येथून जत पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. शासकीय कार्यालय व पोलीस ठाणे अशा भागातच चोरांनी तीन लाख लांबवल्याने चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी जत पोलीसांत चंद्रशेखर बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार धुमाळ करत आहेत.
हेही वाचा