सांगली : आटूगडेवाडी-मेणीत शाहुवाडीच्या माजी सभापतीचा हवेत गोळीबार | पुढारी

सांगली : आटूगडेवाडी-मेणीत शाहुवाडीच्या माजी सभापतीचा हवेत गोळीबार

कोकरुड; पुढारी वृत्तसेवा : आटूगडेवाडी-मेणी (ता.शिराळा) येथील ढाब्यावर दोन गटात किरकोळ कारणावरुन हाणामारी झाली. शाहुवाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बबन पाटील (रा.शिराळे वारुण ता.शाहुवाडी) यांनी यावेळी पिस्तुलने हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली. हा प्रकार सोमवारी (दि. २४) रात्री घडला. गोळीबार करून दहशत केल्या प्रकरणी बबन पाटील यांना कोकरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.जयेश निकम रा. उंडाळे ता. कराड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री उंडाळे येथील जयेश निकम त्याच्या मित्रासोबत आटूगडेवाडी येथील ढाब्यावर जेवायला आले होते. त्याच वेळी शाहुवाडी तालुक्याचे माजी सभापती बबन उर्फ आनंद पाटील हे समर्थक, युवक कार्यकर्त्यांसोबत जेवण करण्यासाठी आले होते. ढाब्याच्या दरवाजातुन जात असताना जयेश निकम याचा बबन पाटील यांना धक्का लागला. त्यावरून वादावादी सुरू झाली. दोन्ही गटातील काही जनानी मद्य प्राशन केल्याने हाणामारी सुरू झाली. माजी सभापती बबन पाटील यांनी खिशातील काळ्या रंगाचे पिस्तूल काढून चार गोळ्या हवेत झाडल्या. पाटील यांनी, “मी सभापती आहे, एका एकास गोळ्या घालीन” अशी धमकी दिली. गोळीबारानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तेथे दहशतीचे वातावरण होते.

हेही वाचा

Back to top button