कोल्हापूर : अनेक धंद्यात बुडालेला ‘भैयासाहेब’ बनावट नोटांकडे | पुढारी

कोल्हापूर : अनेक धंद्यात बुडालेला ‘भैयासाहेब’ बनावट नोटांकडे

कोल्हापूर; गौरव डोंगरे :  ‘इसकी टोपी उसके सर’ या वाक्याला साजेसे तो आजपर्यंत जगला आहे. गावात सायकलवरून फिरणारा तरुण अचानक आलिशान मोटारीतून फिरू लागला. मूळचा राधानगरी तालुक्यातला राहणारा, पण शहर राहणीमानाकडे आकृष्ट झालेला हा तरुण शहरातील फ्लॅटमध्ये आला. एका बड्या राजकीय पुढार्‍याच्या मागेपुढे करणारा हा ‘भैयासाहेब’ स्वत:सोबत बॉडीगार्डही ठेवू लागला. बनावट नोटांपर्यंत पोहोचलेला हा भैया आतापर्यंत अनेक धंद्यात ‘लॉस’ झालेला दिसतो.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर पोलिसांनी बनावट नोटा पकडल्या. बनावट नोटा छपाईप्रकरणी संदीप कांबळे, अभिजित पवार, चंद्रशेखर पाटील व दिग्विजय पाटील अशा चौघांना अटक झाली आहे. यापैकी भैयासाहेब याने आतापर्यंत अनेकांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे येत आहे.

प्रॉपर्टी एजंट ते बनावट सोने खपविणे

फ्लॅट घेणे-देणे, जागांचे व्यवहार करण्यात भैयासाहेब पटाईत होता. ‘लिटिगेशन’मधील मालमत्ता कमी किमतीत खरेदी करायच्या. राजकीय वजनाचा वापर करून त्या इतरांना विकायच्या. पैशांची गरज असल्याचे सांगून तो अनेकांना बनावट सोनेच देत होता, असेही समोर आले आहे.

बॉडीगार्ड घेऊन रुबाब

राधानगरी तालुक्यात वजन निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भैयाचा वापर शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, संभाजीनगर भागात वाढला होता. जिल्ह्यात मोठे राजकीय नेते आले की सोबत बॉडीगार्ड घेऊन त्यांच्यासमोर रुबाब झाडायला भैया तयारच असायचा. त्याने बनावट नोटांचा वापर आपले हे ‘काळे साम—ाज्य’ उभे करण्यासाठी केला असावा का, याचा तपास पोलिस करीत
आहेत.

कर्जबाजारी भैया झाला राजकीय पुढारी

काही वर्षांपूर्वी कर्जबाजारी जीवन जगणार्‍या भैयासाहेबने पत्नीला कसबा तारळे ग्रामपंचयातीत निवडणुकीला उभे केले. पैशाचा वारेमाप वापर या निवडणुकीत केला. गावात एक दूध संस्थाही सुरू केली होती. पण ती अवसायनात निघाली. काळ्या धंद्यातून तो हळूहळू पैसे कमावू लागला. याच काळ्याचे पांढरे करण्यासाठी त्याने राजकीय आधार घेतला.

Back to top button