

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : देशातील वातावरण काळजी करण्यासारखे आहे. सर्व समाज अविवेकी नसला तरी आता लोकांना स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षितता महत्वाची वाटत आहे. दुसऱ्या बाजूला असंख्य तरुण आज समाज जोडण्याचे काम करत आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली.
राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी आणि अक्षर मानव आयोजित 'दोन दिग्गजांची भेट' मुलाखतपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे आणि डॉ. तारा भवाळकर यांच्या मुलाखती पत्रकार मुकुंद कुळे, राम जगताप यांनी घेतल्या.यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, राजन खान आदी उपस्थित होते.
स्त्रियांबाबत अजून पुरोगामी विचार रुजले नाहीत का? या प्रश्नावर बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, गौतम बुद्ध, बसवना, चक्रधर स्वामी, गुरुनानक, ज्ञानेश्वर, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी होते. सामाजिक गतीत अनेक बदल होत गेले आहेत. फुले दाम्पत्यापासून बदल सुरू झाला आहे. लोकांच्या मनावर कर्मकांड, धर्माचा अजून पगडा आहे. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. लोकांच्यामध्ये विवेक जागृत होणे गरजेचे आहे. चढ- उतार समाजात राहणार आहेत.
जाती-धर्माची बंधने अधिक घट्ट झाली आहेत का? धर्म आवश्यक आहे का? या प्रश्नावर बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, धर्माचा अर्थ काय घेतो, यावर सर्व अवलंबून आहे. स्वातंत्र्य, न्याय, समता ही परंपरा आहे. त्यातून जो जगण्याचा मार्ग आहे, तो धर्म आहे.
सामाजिक प्रदूषणावर बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, पुराणकथाना लौकिक, दैवी स्वरूप दिले आहे. विषमता, अन्याय, अवैज्ञानिक दृष्टिकोन असणारी मिथके नाकारली पाहिजेत. ब्राह्मण आणि पुरुष प्रधान समाज निर्माण करण्यासाठी मनुस्मृतीच्या निर्मिती नंतर मिथकामध्ये बदल करण्यात आले. काहींनी हितसंबंधातून रामायण, महाभारत या ग्रंथामध्ये बदल केले आहेत.
परंपरेतील काय स्वीकारले पाहिजे ? या प्रश्नाबाबत डॉ. भवाळकर म्हणाल्या, ज्ञान हे विवेकामधून, विचारामधून मिळते. जुनं असतं ते चांगले असते, असे नाही. विवेकी लोक परीक्षा करून काय घ्यायचे ते ठरवतात. त्यांच्या मनात जिज्ञासा असते. मूर्ख असतात ते विचार न करता तशा परंपरा स्वीकारतात.
स्त्री संतांचा गौरव झाला नाही, यावर बोलताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, धर्म, जात-पात, पंत यापलीकडे संत स्त्रीया होत्या. पण त्याचा गाजावाजा झाला नाही. शहाणपण आणि शिक्षण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. जातीव्यवस्थेची उतरंड आजही आहे. स्त्री संतांच्या साहित्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
लोकधर्मा बद्दल बोलताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, धर्म ही समूहाची कल्पना आहे. लोकधर्मामध्ये अनेक लोकप्रवाह आहेत.जाणीवपूर्वक हे प्रवाह दूषित, कोरडे केले जात आहेत. धर्माला विवेकाने पारखून घेणे महत्त्वाचे आहे.आपण एका उतरणीकडे चाललो आहे काय? यावर विचार व्हायला हवा. लोकधर्म, परंपरा, संस्कृती यामध्ये आपला विवेक जागा असला पाहिजे.
डॉ. सुरज चौगुले यांनी स्वागत केले.
हेही वाचलंत का ?