महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि नेते खूप आहेत, पण जनतेच्या फायद्याचे कुणी नाहीत : गोपाल इटालिया | पुढारी

महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि नेते खूप आहेत, पण जनतेच्या फायद्याचे कुणी नाहीत : गोपाल इटालिया

मुंबई,पुढारी वृत्‍तसेवा : मुंबईच्या सार्वजनिक समस्यांबाबत कोणताही पक्ष गंभीर नाही. सर्वच पक्ष अपयशी ठरले असून एकंदरीत आम आदमी पार्टी हा जनतेसमोर सर्वोत्तम पर्याय आहे, असे वक्तव्य आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी माध्यमांशी बोलताना केले.

गोपाल इटालिया बोलताना म्‍हणाले की, आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये आपले सरकार स्थापन केले आणि अलीकडेच गुजरातमध्ये 13% मतांसह 40 लाख लोकांचा विश्वास जिंकला व 5 आमदारांसह राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला आहे. त्याच बरोबर भाजपची वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या दिल्लीतील एमसीडीला उखडून टाकण्याचे आणि संपूर्ण देशात नवी आशा व नवा विश्वास निर्माण करण्याचे काम आम आदमी पार्टीने केले आहे. आपल्या राज्यात आम आदमी पक्षाचा विस्तार व्हावा, अशी मागणी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक करत आहेत.

आज जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर, महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि नेते खूप आहेत, पण जनतेच्या फायद्याचे एकही पक्ष व नेता नाही. देशातील जनता खूप त्रस्त झालेली आहे. जनतेच्या भल्यासाठी कुणीही काम करत नाही आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो, सर्वांनी जनतेला देवाच्या दयेवर हतबल करून सोडले आहे. आता महाराष्ट्राला एका प्रामाणिक राजकीय पर्यायाची गरज आहे, जो आम आदमी पार्टीच्या रूपाने अस्तित्वात आहे.

महाराष्ट्रातील जनतेने सर्व पक्षांना मतदान करून पाहिले, सर्वांना संधी दिली. पण महानगरपालिकेमध्ये, नगर परिषदेत सर्वांनी मिळून जनतेची लूट केली आहे, त्यामुळेच आम आदमी पार्टी जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मैदानात उतरली आहे. आमचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम आदमी पार्टी महाराष्ट्रात संघटन बांधणीचे काम संपूर्ण ताकदीनिशी करत आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक मग ती छोटी असो वा मोठी संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत.

मुंबईत आम्ही पूर्ण जोमाने निवडणूक लढवणार 

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, मुंबईत आम्ही पूर्ण जोमाने निवडणूक लढवणार आहोत. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता यांसह सर्व प्रश्न व समस्यांचे निराकरण करू. एकनाथ आणि देवेंद्र म्हणजेच ईडी सरकारने आतापर्यंत फक्त निविदा काढण्याचे आणि जनतेला लुबाडण्याचे काम केले आहे. याआधीचे सत्ताधारी पक्ष किंवा आताचे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी कोणतेही काम करत नाही आहे.

आम आदमी पार्टीचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात 

आम आदमी पक्षाचे, महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे यावेळेस म्हणाले की, आम आदमी पार्टीचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात होत आहे. सर्व ग्रामपंचायतींमध्ये पक्षाचे प्रतिनिधी निवडून आले आहेत. नुकतेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढलेल्या आम आदमी पार्टीकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यातील प्रत्येक विभागातील निवडणुकांसाठी आमची संपूर्णपणे तयार सर्वसामान्य जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा, जेणेकरून आम्ही वंचित, शोषित, तरुण, शेतकरी, महिलांसाठी काम करू शकू, अशी अपेक्षा रंगा राचुरे यांनी व्यक्त केली.

.हेही वाचा 

धुळ्यातील तीन बालकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले दत्तक विधान; बालकाला मिळाले इटलीचे आई-बाबा

खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच

बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

Back to top button