आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज कारखान्याशी काय संबंध आहे? हे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर करावे. मागील वर्षी चुकीच्या प्रक्रियेद्वारे बेनामी शेअर कंपनीच्या नावे 98 टक्के शेअर घेतले गेले असून, 100 कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. कारखाना चालविण्यास घेणारी ब्रिक्स कंपनी मुश्रीफ यांच्या जावयाची आहे. मुश्रीफ यांनी मंत्री झाल्यानंतर भ्रष्ट मार्गाने मिळालेला पैसा यात गुंतवल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या कारखान्याबाबतही आपण दोन दिवसांत 'ईडी'सह इन्कम टॅक्स विभागाकडे तक्रार करणार आहे, असे ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्याकडे जाण्यास मनाई करण्यात आल्यानंतर कराडच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी दुसर्या घोटाळ्याचा आरोप केला.
सोमय्या म्हणाले, यापूर्वीच आपण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध 'ईडी', इन्कम टॅक्स विभाग, सहकार मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी अतिरिक्त माहितीही मागवण्यात आली आहे. ही माहिती आपण दोन दिवसांत 'ईडी'ला देणार आहे.
गडहिंग्लज कारखान्यात अपारदर्शक व्यवहार
सरसेनापती घोरपडे कारखान्याप्रमाणेच गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलवडे कारखान्यात अपारदर्शकपणे व्यवहार झाला आहे. कोलकाता येथील बेनामी शेअर्स कंपनीच्या नावे बनावट खोटे खाते काढण्यात आले आहे. ही बेनामी कंपनी अनेक वर्षे बंद आहे. त्यानंतरही या खात्यात मुश्रीफ यांच्या एजंटने पैसे टाकले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या जावयांच्या नावेही 998 शेअर्स आहेत. ब्रिक्स इंडिया कार्पोरेशन या बेनामी कंपनीचे मालक मुश्रीफ यांचे जावई हेच आहेत. या कंपनीने गडहिंग्लज कारखाना चालविण्यास घेतला होता.
मागील वर्षी चुकीची लिलाव प्रक्रिया राबवत गडहिंग्लज कारखाना घेण्यात आला. एस. यू. कार्पोरेशनचे 7 हजार 185 शेअर्स आहेत. मुश्रीफ यांनी मंत्री झाल्यावर भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा यात गुंतवल्याचा दावा करून या कारखान्याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनी मला सहा तास कोंडले
मुंबईत मुलुंड पोलिसांनी मला 6 तास बेकायदा अडवून ठेवत गणेश विसर्जनास जाण्यापासून रोखले. पोलिसांच्या या बेकायदा कृत्यास ठाकरे सरकारच जबाबदार आहे. पोलिसांनी मला खोटी ऑर्डर दाखवली. त्यामुळे आपण ठाकरे सरकारविरुद्ध कायदेशीर लढाई लढणार असून, मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह मुंबई पोलिसांविरुद्ध गंभीर आरोप करत घणाघाती टीका केली.
घोटाळे उघड करणार्यांना तक्रार देण्यापासून रोखत ठाकरे सरकारने नवा इतिहास निर्माण केला आहे. आपण कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येत असल्याचे कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पोलिसांना कळवले होते. मात्र, असे असूनही रविवारी गणेश विसर्जन करण्यासाठी जाण्यापासून आपणास 6 तास रोखण्यात आले, असे ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी मुंबईबाहेर पडण्यास मनाई करणारा आदेश काढलेला नाही. आपणास कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशास मनाई करण्यात आली असतानाही मुंबईत अडवण्यात आले. वकिलांनी पोलिसांना नोटीस दिल्यानंतर आपणास घरातून बाहेर विजर्सनासाठी पडता आले, असे ते म्हणाले.
धक्काबुक्की केल्याचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरही आपणास अडवण्यात आले. आदेश दाखवण्याची मागणी करूनही आदेश दाखवला नाही. अर्धा तास अडवत आपणास धक्काबुक्कीही झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला.