तासगाव तालुक्यात “राष्ट्रवादी पुन्हा”; १४ ग्रामपंचायतीवर आमदार गटाचा झेंडा | पुढारी

तासगाव तालुक्यात "राष्ट्रवादी पुन्हा"; १४ ग्रामपंचायतीवर आमदार गटाचा झेंडा

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरवडे व चिंचणी ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. तर उर्वरीत २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १३ गावामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील समर्थकांचा झेंडा फडकला आहे. तर आठ ग्रामपंचायतीमध्ये खासदार संजय पाटील समर्थकांची सत्ता आली आहे. तीन ग्रामपंचायतीमध्ये मात्र संमिश्र गटाची सत्ता आली आहे.

या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार व खासदार गटाकडून जोरदार विजयोत्सव साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच गावांमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीसह फटक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

या ग्रामपंचायत निवडणुकीत ११ गावामध्ये सत्तांतर झाले आहे. मतकुणकी, नागाव निमनी, बलगवडे, योगेवाडी, शिरगाव कवठे, वायफळे, बस्तवडे आणि वासुंबे या आठ गावात खासदार गटाने सत्ता गमावली. वंजारवाडी, मणेराजुरी व उपळावी या तीन गावात आमदार गटाची सत्ता गेली आहे.

मणेराजुरी, वायफळे, पुणदी, योगेवाडी, बलगवडे, नागेवाडी या सहा गावांमध्ये सरपंच एका गटाचा निवडून आला आहे, तर सदस्याचे बहुमत विरोधी गटाकडे गेले आहे.

मणेराजुरी – वायफळेत धक्कादायक निकाल

या निवडणुकीत मणेराजुरी आणि वायफळे या दोन ग्रामपंचायतींचे निकाल धक्कादायक हे लागले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मणेराजुरीत आमदार गटाचे १७ पैकी १५ सदस्य निवडून आले आहेत. सरपंच पदाचा उमेदवार खासदार गटाचा निवडून आला. वायफळे मध्ये १३ पैकी सात सदस्य खासदार गटाचे निवडून आले पण सरपंच पदाचा उमेदवार मात्र आमदार गटाचा निवडून आला.

२६ ग्रामपंचायतीमधील गटनिहाय सत्ता

आमदार गट : अंजनी, आरवडे, बेंद्री, वासुंबे, मतकुणकी, नागाव निमनी, बस्तवडे, बलगवडे, कचरेवाडी, नागेवाडी, नेहरुनगर, शिरगाव कवठे, योगेवाडी, वायफळे.

खासदार गट : भैरववाडी, पानमळेवाडी, पुणदी, लिंब, उपळावी, खुजगाव, वंजारवाडी, कुमठे, मणेराजुरी

संमीश्र आघाडी : चिंचणी, सावर्डे, निमणी

वासुंबेत खासदार गटाचा सुफडासाफ

वासुंबे ग्रामपंचायतीमध्ये खासदार गटाकडून आमदार गटाने सत्ता हिसकावून घेतली. सरपंच पद आणि १३ जागांवर आमदार गटाचे सदस्य निवडून आले. गावामध्ये १४-० अशी मात देत आमदार गटाने खासदार गट सुपडा साफ केला.

अधिक वाचा :

Back to top button