सांगली : नागेवाडीत अधिकाऱ्यानेच केले अशिक्षित महिलेचे मतदान; इव्हीएम घेऊन जाणारी एसटी रोखली

नागेवाडी : ईव्हीएम मशिन घेऊन जाणारी रोखण्यात आलेली एसटी बस
नागेवाडी : ईव्हीएम मशिन घेऊन जाणारी रोखण्यात आलेली एसटी बस

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : नागेवाडी (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका अशिक्षित महिला मतदाराच्या अज्ञानाचा फायदा घेत मतदान केंद्रावरती नियुक्त असलेल्या अधिकाऱ्याने मतदान केल्याचा गंभीर आरोप संबंधित मतदारासह उपस्थित उमेदवार प्रतिनिधींनी केला.

मतदान केंद्रावरती अधिका-याने अधिकाराचा गैरफायदा घेत केलेल्या मतदानाच्या कारणावरुन गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. ईव्हीएम घेऊन जाणारी एसटी बस प्रचंड आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रोखली. अखेर दोन्ही गटाचे उमेदवार प्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या चर्चेनंतर सदर वादावर पडदा टाकण्यात आला.

रविवारी दिवसभर सदर ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी प्रभाग एकच्या मतदान केंद्रावर एक महिला मतदानास आली होती. मतदान नेमके कसे करायचे तिला समजले नाही. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत उपस्थित असणाऱ्या एका अधिकाऱ्यानेच तिचे मतदान केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिला मतदार व केंद्रातील उमेदवार प्रतिनिधीने केला.

या कारणावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम परत घेऊन जात असताना आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी एसटीच रोखली. अधिकाराचा गैरफायदा घेऊन मतदान करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, मगच एसटी सोडतो असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

या घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती तहसीलदार रवींद्र रांजणे यांना देण्यात आली. परंतू प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी नागेवाडीत पोहोचण्यापूर्वीच दोन्ही गटातील ग्रामस्थ आणि उमेदवार प्रतिनिधींनी चर्चा करून या विषयावर पडदा टाकला. रात्री उशिरा ईव्हीएम घेऊन एसटी तासगावला रवाना झाली.

हेही वाचा…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news