सांगली : ऐतवडे खुर्दमध्ये लग्न मंडपातून थेट मुंडावळ्यासह नवरदेव मतदानाला हजर | पुढारी

सांगली : ऐतवडे खुर्दमध्ये लग्न मंडपातून थेट मुंडावळ्यासह नवरदेव मतदानाला हजर

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीत मतदानाला खूप मोठे महत्त्व आहे. मतदान जर आपण केलं तर आपण येणाऱ्या सरकारला किंवा सत्तेवर येणाऱ्या राजकारणाला आपल्या मताचे महत्त्व पटवून सांगू शकतो. यासाठीच आजच्या दिवशी आपलं लग्न असताना सुद्धा ऐतवडे खुर्द (ता.वाळवा) येथील एका तरुणाने बोहल्यावर चढल्यानंतर तत्काळ मुंडावळ्यासह नववधूला घेऊन थेट मतदानाचा अधिकार बजावला.

वाळवा तालुक्यात ८८ ग्रामपंचायतीसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातील ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित ७९ ग्रामपंचायतीसाठी रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीसाठी ही आज मतदान झाले.

याच दिवशी गावातील युवक सुशांत सुतार याचे लग्न होते. लग्नाची धामधूम सुरू असताना आपल्याच गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने त्यासाठी लोकशाहीने त्याला दिलेला जो अधिकार आहे. तो अधिकार बजावण्यासाठी त्यांनी लग्नानंतर प्रथम मतदानाला महत्त्व दिले. बोहल्यावर चढल्यानंतर तत्काळ मुंडावळ्यासह नववधूला घेऊन सुशांत थेट मतदान केंद्रावर पोहचला व त्याने मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सुशांतने बजावलेल्या या मतदानाच्या कर्तव्याचे आज संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

अधिक वाचा :

Back to top button