सांगली जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान | पुढारी

सांगली जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. मतदान केंद्रावर सुमारे 10 हजार कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले असून पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे.

मतदानासाठी आवश्यक असणारी इव्हीएम मशीन सीयू 2080 आणि बीयू 3017 उपलब्ध केली आहेत. त्याशिवाय 10 हजार 257 कर्मचारी, अधिकारी नियुक्त केले आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारण मतदान केंद्र 1538, सर्वेदनशील मतदान केंद्रांची संख्या 327 तर अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या-20 आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान निवडणूक होणार्‍या मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणार्‍या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येणार आहे.

अधिक वाचा :

Back to top button