सांगली : रेल्वे भरतीच्या आमिषाने चार युवकांना ६० लाखांचा गंडा, आरोपी अटकेत | पुढारी

सांगली : रेल्वे भरतीच्या आमिषाने चार युवकांना ६० लाखांचा गंडा, आरोपी अटकेत

विटा, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे भरतीचे आमिष दाखवून खानापूर, माण आणि वाळवा तालुक्यातील चार युवकांची ६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका गलाई व्यावसायिकाच्या विरोधात विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बालाजी भीमराव देवकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा वेजेगाव (ता.खानापूर) येथील रहिवाशी आहे. याबाबत फसवणुकीला बळी पडलेल्या प्रविण विलास खुपकर (वय २२ रा. भिकवडी ता. खानापूर) याने फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, गेल्यात काही दिवसांपासून प्रवीण खूपकर हा युवक त्याच्या मित्रांसह नोकरीच्या शोधात होता. दरम्यान, प्रवीण खूपकर याच्या वडिलांचा मित्र असलेल्या बालाजी देवकर या गलाई व्यावसायिकने ही नामी संधी मानून प्रवीण यास आपले वरपर्यंत संबंध आहेत, असे सांगून आपण भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकऱ्या लावू शकतो. मात्र, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील असे सांगितले. शिवाय गोड बोलून विश्वास संपादन करत बालाजी देवकर याने प्रवीण यास आपल्या मोबाईल वरून काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना फोनही लावण्याचे नाटक केले. यात प्रवीण आपसूकच बालाजी देवकर याच्या जाळ्यात ओढला गेला.

प्रवीणने त्याचे मित्र महेश चंद्रकांत नलवडे (रा वलखड ता खानापूर), महावीर विलास पुकळे (रा जांभुळणी ता माण जि सातारा), सुनिल अर्जुन पवार (रा.किल्ले मच्छिंद्रगड ता वाळवा) यांना बालाजी देवकर हे आपल्याला नोकरी लावू शकतात. मात्र. त्यासाठी पैसे आपण तयार ठेवले पाहिजेत असे सांगितले. त्यानंतर बालाजी देवकर याने या चौघांची बैठक वेजेगाव येथे घेतली. त्यावेळी त्याने या चौघांना रेल्वेच्या ग्रुप सी पदासाठी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी लावतो. परंतु, त्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपये पाहिजेत, अशी मागणी केली. त्यावर २७ जुलै २०२१ पासून टप्याटप्याने प्रवीण ने १३ लाख ७५ हजार तर त्याचे मित्र महेश नलवडे, महावीर पुकळे आणि सुनील पवार ने प्रत्येकी १५ लाख रुपये असे एकूण ५८ लाख ७५ हजार रूपये रोख स्वरूपात बालाजी देवकर यास वेळोवेळी दिले. त्यानंतर त्यांना ‘रेल्वेचे तुम्हाला जॉइनिंग लेटर येईल असे ही सांगितले. त्यानुसार या चौघांनाही रेल्वे विभागाचे कॅश रिसीव्हड सर्टीफिकेट आणि जॉइनिंग लेटरही पाठविले. शिवाय ११ डिसेंबर रोजी तुम्हाला रेल्वे नोकरीचा कॉल येईल आणि तुम्ही चौघेही भरती व्हाल, असे सांगितले.

मात्र ११ डिसेंबर पासून काल १५ डिसेंबरअखेर पर्यंत कोणताही कॉल आला नाही. शिवाय अधिक माहिती घेतली असता रेल्वे विभागाचे कॅश रिसीव्हड सर्टीफिकेट आणि जॉइनिंग लेटरही बनावट सही शिक्क्यांचे असल्याचे उघडकीस झाले. त्यानंतर मात्र या चौघांनी थेट विटा पोलिसांत धाव घेतली.  यानंतर बालाजी देवकर याच्या विरोधात बनावट व्यक्ती अगर गोष्टी तयार करून फसविणे, तोतयागिरी करणे, धाकदपटशाने फसवणूक करणे इत्यादी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  दरम्यान, बालाजी देवकर यास विटा पोलिसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button