

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महापालिका क्षेत्रापासून 40 किलोमीटर अंतरावरील गावे, शहरे अर्बन अॅग्लोमरेशन (शहरी समूह) मध्ये समाविष्ट करावीत. महापालिका आयुक्तांनी ही जबाबदारी पार पाडावी. तसे झाल्यास आष्टा, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ या पालिकांबरोबरच सत्तरहून अधिक गावांना विकासासाठी शहरी विभागाचे फायदे, वाढीव निधी मिळेल, असे नागरिक जागृती मंचने म्हटले आहे.
अकरा लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ‘शहरी समूहा’ला हे लाभ शक्य...
शहरी वाहतूक, रिंग रोड.
बस रॅपिड ट्रान्स्पोर्टअंतर्गत मिळणार 100 ते 150 सिटी बसेस.
आष्टा, तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ नगरपालिकांना भरीव निधी.
शहरी समूहातील ग्रामपंचायतींना ड्रेनेज, शाळा, पथदिवे, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी भरीव निधी.
आष्टा, तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ या शहरांत बांधकामांसाठी महापालिकेइतका एफ.एस.आय. उपलब्ध प्लॉटवर जास्त बांधकाम होणार शक्य.
सांगली शहरी समूहातील ग्रामपंचायती, नगरपालिकांना अनेक योजना, कामांसाठी मिळेल भरीव निधी.
नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, एक मुख्य महानगरपालिका आणि त्या शेजारच्या 40 किलोमीटर अंतरावरील इतर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायत मिळून एक अर्बन अॅग्लोमरेशन बनतो. अर्बन अग्लोमरेशनसाठी कोणतीही नगरपालिका, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीला मुख्य महानगरपालिकेत सामील होण्याची गरज नसते. सांगली जिल्ह्यात एकच महानगरपालिका आहे. या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येत 40 कि.मी. परिसरातील शहरे, गावांची फक्त लोकसंख्या समाविष्ट केल्यास वाढीव लोकसंख्येच्या आधारे अर्बन अॅग्लोमरेशनमधील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी भरीव निधी मिळेल.
बुधगाव, कवलापूर, कवठेएकंद, कुमठे, तासगाव, उपळावी, मणेराजुरी, करोली, आरवडे, समडोळी, दानोळी, कवठेपिरान, तुंग, मिरजवाडी, कसबे डिग्रज, दुधगाव, आष्टा, पद्माळे, कर्नाळ, नावरसवाडी, नांद्रे, वसगडे, सुखवाडी, भिलवडी, पलूस, येळावी, सांडगेवाडी, कुंडल, किर्लोस्करवाडी, इनामधामणी, जुनीधामणी, बामनोली, सावळी, पाटगाव, भोसे, सोनी, अलकूड, बोरगाव, शिरढोण, देशिंग, कवठेमहांकाळ, मालगाव, बेडग, बेळंकी, आरग, सलगरे, आमणापूर, अंकली, हरिपूर, उदगाव, जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी, कानडवाडी, खोतवाडी, बामणी, निलजी, कळंबी, टाकळी, नरवाड, म्हैसाळ, सिद्धेवाडी, कळंबी, कांचनपूर, माळेवाडी, एरंडोली, कारंदवाडी.