सांगली : राजारामबापू कारखान्याने जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फोडली | पुढारी

सांगली : राजारामबापू कारखान्याने जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फोडली

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिट नं. १, वाटेगाव-सुरुल युनिट नं. २ व कारंदवाडी युनिट नं. ३ कडे गाळपास येणाऱ्या उसाला ३ हजार रुपये प्रति मे. टन पहिला हप्ता देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केली. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, “गळीत हंगाम समाप्ती नंतर प्रत्यक्ष सरासरी साखर उताऱ्यावरील एफआरपीमधून तोडणी खर्च वजा जाता येणारी उर्वरित रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केली जाईल. कारखान्याचे तिप्पेहळ्ळी- जत युनिट नं. ४ कडे गळीत येणाऱ्या उसास दोन हजार ५०० रुपये आदा करण्याचे ठरले आहे.”

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनीही शेतकरी हा केंद्रबिंदू मानून निर्णय घेतलेले आहेत. कारखान्याचे साखराळे युनिट नं. १ ला ११  लाख मे. टन, वाटेगाव- सुरुल युनिट नं. २ ला ६ लाख मे. टन, तसेच कारंदवाडी युनिट नं. ३ कडे ५ लाख मे. टन असे २२ लाख मे. टन गाळपाची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. तसेच तिप्पेहळ्ळी-जत युनिट नं. ४ कडे. चार लाख मे. टन उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक विराज शिंदे, दिलीपराव पाटील, श्रेणिक कबाडे, एल. बी. माळी, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, चीफ अकौंटंट संतोष खटावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button