गायरानातील अतिक्रमणे नियमित करा: आमदार सुमन पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | पुढारी

गायरानातील अतिक्रमणे नियमित करा: आमदार सुमन पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तासगाव; पुढारी वृत्तसेवा: गायरानातील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. परंतु अतिक्रमणे हटवल्यानंतर लोक बेघर झाल्यास पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. राज्यातील लाखो कुटुंबाचा या सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. तूर्त तरी सर्वच गायरानातील अतिक्रमणे काढण्यास स्थगिती द्यावी. ही अतिक्रमणे नियमित करावीत, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गायरान जमिनीतील अतिक्रमणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासकीय, गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत कळवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेवरील आदेशाच्या अनुषंगाने शासनाने सर्व अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिलेले आहेत.

तासगाव तालुक्यातील २ हजार ३८७ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे १ हजार ७०० अशी ४ हजार ८७ अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पण हे सर्वच अतिशय गरीब लोक असून मोलमजूरी करुन जगत आहेत. त्यांच्याकडे जगण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. हे लोक बेघर झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उद्भवणार आहे. या सर्वच लोकांनी आपल्या कष्टातून आणि बचतीमधूनच  बांधलेली घरे उद्ध्वस्त होणार आहेत. अतिक्रमणे निष्कासीत केल्यास त्याचा संसार उघड्यावर पडणार आहे.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणे निष्कासित करण्याचे निर्देश दिलेले आहेत, तरी माणुसकी व संवेदना बाळगून सर्व लोकांना बेघर होण्यापासून वाचण्यासाठी ठाम पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाकडून धोरणात्मक निर्णयातून एखाद्या योजनेमध्ये हा गंभीर विषय समाविष्ट करून सदरची अतिक्रमणे नियमित करावीत व गोरगरीब लोकांच्या प्रश्न सोडवावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button