दीड वर्षाचा चिमुकला भजन – किर्तनात झाला तल्लीन | पुढारी

दीड वर्षाचा चिमुकला भजन - किर्तनात झाला तल्लीन

जत : विजय रूपनुर

चिक्कलगी भुयार मठात श्री संत सयाजी बागडे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भजन – किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दीड वर्षाचा चिमुकला टाळ – मृदंगाच्या तालावर तल्लीन झाला होता. या दीड वर्षाच्या चिमुकल्याचे मोबईल सोडून भजन किर्तनात तल्लीन होणे उपस्थित भक्तगणांचा कुतूहलाचा विषय ठरले.

महाराष्ट्राला थोर संतांच्या व समाजसुधारकांच्या विचारांची परंपरा आहे. हल्लीच्या युगात लहान मुले हिंदी व मराठी रिमिक्स गाण्याच्या तालावर थिरकताना दिसतात. अनेक चिमुकल्यांच्या हातात सातत्याने मोबईल पहावयास मिळतो. मात्र चिक्कलगी भुयार येथील हा दीड वर्षाचा चिमुकला भजन आणि कीर्तनात रममाण होत आहे.

भजन – किर्तनात मंत्रमुग्ध झालेल्या श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हजारो भक्त पुण्यतिथीनिमित्त आपली हजेरी लावतात. मठाधिपती ह भ प तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेल्या पुण्यतिथी सोहळ्यात भक्त भजन कीर्तन नामस्मरणाचा लाभ घेतात.

दरम्यान असेच एक भजन कीर्तन सुरू असताना कांबळे नावाच्या दाम्पत्यांनी समर्थ कांबळे दीड वर्षाच्या चिमुकल्याला आणले होते. चिमुकल्यांनी टाळ – मृदंगाच्या तालावर तल्लीन होऊन टाळ्या पिटू लागला. पंधरा मिनिटाच्या पुढे समर्थ टाळ्या वाजवतच होता. भजन कीर्तनाला साद देण्याचा प्रयत्न करत होता. एका भाविकाने आपल्या कुतूहलापोटी मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला आहे हा व्हिडीओ सर्वत्र सोशल मीडियावर फिरू लागला आहे.

अध्यात्मचा फार मोठा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. घरातील वारकरी संप्रदायाचं वातावरण असेल तर त्यांची मुलेही शक्यतो वारकरीच संप्रदायाच्या विचाराचे असतात. आई-वडिलांच्या आचार, विचाराचा प्रभाव त्यांच्या पाल्यावर पडत असतो. हल्ली मात्र लहान चिमुकलीच्या हातात मोबाईल सर्रास दिसतो. मोबाईल मध्ये गाणे आणि व्हिडिओ लहान मुले एकटक नजरेने पाहत असतात. परंतु अपवादात्मक असे व्हिडिओ कमी प्रमाणात आढळून येतात या लहान चिमुकलाच्या मंत्रमुग्ध झालेल्या समर्थ कांबळे यांच्या व्हिडिओची चर्चा वारकरी संप्रदायात सुरू आहे.

Back to top button