Lumpy Skin Disease | खानापूर तालुक्यात लम्पी वेगाने पसरतोय; ३५ जनावरे दगावली | पुढारी

Lumpy Skin Disease | खानापूर तालुक्यात लम्पी वेगाने पसरतोय; ३५ जनावरे दगावली

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यात लम्पी  (Lumpy Skin Disease) रोगाने तब्बल ३५ जनावरे दगावलेली आहेत. हा रोग वेगाने पसरत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पशु पालक हवालदिल झालेला आहे. खानापूर तालुक्यात लम्पी रोगाचा विळखा दिवसें दिवस घट्ट होवू लागला आहे. तालुक्यात आतापर्यंत ४९७ जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यापैकी १८२ जनावरे बरी झाली आहेत. तर २७८ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

शेतकऱ्यांनी जीवापाड जोपासलेली जनावरे लम्पी (Lumpy Skin Disease) रोगामुळे मृत्यूमुखी पडली आहेत. त्याची भरपाई तातडीने प्रशासनाने द्यावी, अशी मागणी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा या राज्यामधील तसेच महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा व पलूस, शिराळा तालुक्यात लम्पी रोगाची लक्षणे असणारी जनावरे आढळून आली होती.

तालुक्यातील पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी तातडीने लसीकरण करून घेतले. शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी, दूध उत्पादकांसाठी त्यांची जनावरे ही त्यांच्यासाठी एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन आहेत. त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या जनावरांच्या दुधामधून येणाऱ्या पैशांवर अवलंबून आहे. मात्र, लम्पी रोगाचा प्रसार झपाट्याने होऊन तालुक्यात जनावरे दगावू लागल्याने चिंता वाढली आहे.

Lumpy Skin Disease : आठवडे बाजार बंद तरी मृत्यू सुरूच

तालुक्याचे मुख्य ठिकाण विटा शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रत्येक सोमवारी बाजार भरतो. या बाजारात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जनावरांची मोठ्या प्रमाणात आवक असते. खबरदारीचा उपाय म्हणून गाई, म्हशीचा आठवडी बाजार जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आला आहे. तरीही लम्पी रोगाने जनावरे दगावली आहेत. हे चिंताजनक आहे.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर

खानापूर, पळशी, वेजेगाव, लेंगरे, आळसंद, भाळवणी, माहुली, घानवड, याठिकाणी पशू वैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तातडीने बैठका घेत लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. योग्य त्या सूचना आणि आदेश जारी केले होते. आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय राबविले होते. मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button