सांगली : मोबाईल देत नाही म्हणून १० वर्षाच्या मुलाचे घरातून पलायन | पुढारी

सांगली : मोबाईल देत नाही म्हणून १० वर्षाच्या मुलाचे घरातून पलायन

पलूस; पुढारी वृत्तसेवा : लहान बहीण मोबाईल देत नाही म्हणून एका १० वर्षीय मुलाने घरातून पलायन केले. मात्र, पलूस एसटी स्टँड आणि पलूस पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलाचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. या मुलाला समजावून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आयान शहीद मुल्ला (वय १०, रा. चिखलगोटण) असे पलायन केलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पलूस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि.५) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पलूस एसटी बसस्थानकात एक अल्पवयीन १० वर्षाचा मुलगा पलूस ते कराड जाणाऱ्या एसटीमध्ये बसलेला दिसला. त्यावेळी वाहक राहुल अरुण पाटील यांनी सदर मुलास कोठे जाणार आहेस? तिकीट काढायला लागेल असे विचारताच त्या मुलाने माझ्याजवळ पैसे नाहीत, असे सांगितले. त्यामुळे राहुल पाटील यांना सदर मुलाकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव आयान शहीद मुल्ला (रा.चिखलगोटण) असे सांगितले. तसेच घरातून रुसून आलो आहे, असे सांगताच वाहक राहुल पाटील यांनी तात्काळ पलूस पोलीस ठाण्यात संपर्क साधून वरील मुलाबाबत माहिती कळवली. त्यानंतर पलूस पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी मुलास तात्काळ ताब्यात घेण्याकरीता पोलीस रवाना केले.

मुलास ताब्यात घेवून ठाण्यात आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी विचारपूस केली. यावेळी या मुलाने आपली लहान बहीण मोबाईल देत नाही म्हणून रुसून आलो आहे, असे सांगितले. दरम्यान आई वडिलांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. बालकास पोलिसांनी पालकांचे समुपदेशन करून ताब्यात दिले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सर्व पालकांना आपल्या लहान मुलाबाबत योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button