सांगली : द्राक्षबागांच्या पिकछाटणीला ब्रेक; फक्त २७ टक्के क्षेत्रावरील छाटणीला मजूर मिळेना
तासगाव : दिलीप जाधव : गेल्या वर्षी लांबलेला द्राक्ष काढणी हंगाम, यामुळेच लांबलेल्या खरड छाटण्या व परतीच्या पावसाच्या धास्तीमुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांच्या पिकछाटणीला ब्रेक लागलेला आहे. आतापर्यंत २७ टक्के क्षेत्रावरील द्राक्षबागांची पिकछाटणी पूर्ण झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यात उर्वरीत क्षेत्राची छाटणी पूर्ण करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु आहे. जिल्ह्यात मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने मजूर मिळविण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतक-यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्ह्यात ३७ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावरती द्राक्षबागा आहेत. पिकछाटणी हंगाम हा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुरु होतो. ऑगस्ट अखेर १५ टक्के, सप्टेंबरअखेरीस ५५ टक्के, ऑक्टोबर अखेरीस ८५ टक्के क्षेत्रावरील छाटणी पूर्ण होत असते. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात उर्वरीत १५ टक्के क्षेत्रावरील छाटणी पूर्ण होत असते.
गेल्या हंगामात एप्रिल अखेर द्राक्षे शेतक-यांच्या द्राक्ष बागेतच होती. यामुळे खरड छाटणी लांबली गेली. पर्यायाने द्राक्षकाडी तयार व्हायला वेळ लागला. दरवर्षी ऑगस्टअखेरीस द्राक्षकाडी तयार होत असे. यंदा द्राक्षकाडी तयार व्हायला सप्टेंबर अखेर आली. द्राक्षकाडी लवकर तयार न झाल्याने कांही अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यात पीक छाटणी सुरु झाली नाही. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस मात्र, पीकछाटणी सुरु झाली आहे. सप्टेंबरअखेर तालुक्यातील ३७ हजार ७९१ हेक्टर पैकी केवळ ७ हजार ५५० हेक्टर क्षेत्राची पीकछाटणी पूर्ण झाली होती.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला पिकछाटणीने जोर धरला आहे. तरीही १० ऑक्टोबरअखेर फक्त १० हजार १९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकछाटणी पूर्ण झालेली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या २७ टक्के एवढे आहे. आता एकाच वेळी उर्वरीत ७३ टक्के क्षेत्रावरील द्राक्षबागांच्या पिक छाटणीची लगबग सुरु होणार आहे. यामुळे ऐन गरजेच्या वेळी मजूरांची कमतरता भासू लागली आहे.
जिल्ह्यात २७ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांची पीकछाटणी बाकी आहे. ही छाटणी १० नोहेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सर्वत्र एकाच वेळी पिकछाटणी सुरु होणार आहे. अशातच कोरोनाच्या काळात परत गेलेले निम्मे बिहारी मजूर अद्याप परत आले नाहीत. यामुळे तालुक्यात मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
१० ऑक्टोबर अखेरची तालुकानिहाय पिकछाटणी हेक्टरमध्ये
तालुका द्राक्षबागा (हे) छाटणी (हे) टक्केवारी
मिरज ८८३४ २६५० ३०%
वाळवा १४८९ ४३१ २८%
शिराळा —— —– —–
तासगाव ९७३१ ३११३ ३१%
खापापूर ६६० १८४ २७%
पलूस १७०४ ५११ २९%
कडेगाव २२९ ७० ३०%
आटपाडी ५६८ १६४ २८%
जत ६४२६ १७०० २६%
क. महांकाळ ४१५० १३७० ३३%
…………………………………………………………………………………………………………………………………………..
एकूण ३७७९१ १०१९३ २७ %