950 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट पाथर्डी शहरामध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई | पुढारी

950 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट पाथर्डी शहरामध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी शहरात एका दूध विक्रेत्याकडे तब्बल साडेनऊशे लिटर भेसळयुक्त दूध आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करीत हे दूध नष्ट केले. शेवगाव येथील तालुका दूध संघाच्या जागेत असलेल्या मे. सनफ्रेश एप्रो इंडस्ट्रिीजच्या दूध संकलन केंद्रात तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रदीप कुटे हे गेले होते. त्यांना त्या ठिकाणी पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदानावर असलेल्या विवेकानंद दूध संकलन केंद्रातून जमा झालेले साडेनऊशे लिटर गायीचे दूध भेसळयुक्त असल्याचे दिसून आले.

कुटे यांनी या दुधाची इंडिफॉस मशीनवर तपासणी केली असता, त्यामध्ये साखरेचे व आम्लतेचे सुद्धा अधिक प्रमाण आढळून आले. शिवाय हे दूध ज्ञानदेव शहादेव घुले यांनी ज्या कॅनमधून आणले होते, त्या कॅनच्या आतून कीटन असलेले प्लास्टिक सुद्धा आढळून आल्याने कुटे यांनी तातडीने हे साडेनऊशे लिटर दूध नष्ट केले. ही सर्व कारवाई कुटे यांनी सहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध विकणार्‍या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Back to top button