चाकणला एकात्मिक प्रशासकीय इमारत ! सर्व शासकीय कार्यालये लवकरच येणार एकत्र | पुढारी

चाकणला एकात्मिक प्रशासकीय इमारत ! सर्व शासकीय कार्यालये लवकरच येणार एकत्र

चाकण; पुढारी वृत्तसेवा: सर्वच प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत यासाठी नागरिकांनी चालवलेल्या पाठपुराव्यास लवकरच यश येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चाकण मार्केट यार्ड समोरील गट नंबर 2493 या जागेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी खेडच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी गुरुवारी (दि. 13) केली. लवकरच जिल्हाधिकारी यांना जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. चाकण नगरपरिषद आणि एकत्रित सर्व विभागांची प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी गुरुवारी या जागेची स्थळपाहणी केली.

यावेळी चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्यासह, पोलिस ठाणे, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. चाकण नगरपरिषद हद्दीतील गट नंबर 2493 क्षेत्र 1.92 हे.आर ही जागा मध्यवर्ती प्रशासकीय कायार्लयासाठी उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे बाजार समितीचे संचालक राम गोरे, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, कालिदास वाडेकर, कुमार गोरे, अ‍ॅड. नीलेश कड, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब पठारे, दत्ता गोरे, संजय गोरे, नवनाथ शेवकरी आदींनी सांगितले.

याबाबत तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या लेखी पत्रानुसार चाकण मधील सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याबाबतच्या सूचना होत्या. त्यानुसार चाकणमधील सरकारी पड असलेल्या गट नंबर 2493 ची पाहणी केली.
गट नंबर 2493 ही मोक्याची जागा चाकण नगरपरिषद, पोलिस ठाणे आणि अन्य सर्व शासकीय कार्यालयांना देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित जमीन एचपीसीएलकडे हस्तांतरित करण्याबाबतचा एमओयू (सामंजस्य करारनामा) करण्यात आला होता.

त्यामुळे चार वर्षांपूर्वी (सन 2018) खेडचे तत्कालीन आ. स्व. सुरेश गोरे यांच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या मंर्त्यांशी चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनीदेखील यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर निर्णय दुरुस्ती प्रस्ताव देण्यात आला होता. स्थानिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्याने शहरात सर्वच प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Back to top button