सांगली : लिफ्टच्या बहाण्याने भाजीपाला विक्रेत्या वृद्ध महिलेस लुटले | पुढारी

सांगली : लिफ्टच्या बहाण्याने भाजीपाला विक्रेत्या वृद्ध महिलेस लुटले

जत, पुढारी वृत्तसेवा : शहरातील संभाजी चौक येथून चार चाकी गाडीतून रामपूर फाट्याला सोडतो असे सांगून एका वृद्ध महिलेचे ६२ हजार रुपयेचे दागिने व पैसे लुटल्याची घटना घडली आहे. गंगाबाई सिद्राम माळी (वय ८५) रा.रामपूर)असे लूट झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात दोन महिला व एका वाहन चालका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गंगाबाई माळी ह्या बुधवारी जत शहरात भाजीपाला विकून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. संभाजी चौक येथे थांबल्या होत्या. यावेळी एक चारचाकी गाडी आली व त्यातील चालकाने आजी तुम्हाला कुठे जायचे आहे? सांगा त्याठिकाणी सोडतो. असे म्हणून गाडीमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर गंगाबाई माळी ह्या गाडीत बसल्या. त्या गाडीमध्ये दोन बायका व दोन लहान मुले व एक पुरुष डायव्हर होते, त्यानंतर ती गाडी डफळापुर रस्त्याने जात असताना काळगी यांचे गोडाउन जवळ थांबवली.

गाडीतील दोन महिला पैकी एका महिलेने माळी यांना पकडले व दुसऱ्या महिलेने गळयातील ६० हजार किमतीची बोरमाळ व चेन तसेच जवळील २ हजार रुपये रोख हिसकावून घेतले. वृद्ध महिलेला संशयित आरोपीने गाडीतून ढकलून दिले. परत जतच्या दिशेने गाडी रवाना झाली आहे . घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे व संबंधितांना कसून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button