Compassionate appointment : विवाहित महिला आईवर अवलंबून होती असे म्हणता येणार नाही : अनुकंपा नियुक्तीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलगी विवाहित आहे. त्यामुळे ती उपजीविकेसाठी तिच्या आईवर अवलंबून होती, असे म्हणता येणार नाही. विवाहित मुलीची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे म्हणजे ‘अनुकंपा’च्या मूळ उद्दिष्टांच्या विरुद्ध असेल. त्यामुळे संबंधित विवाहित महिला तिच्या आईच्या मृत्यूनंतर अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात स्पष्ट केले आहे.
( Compassionate appointment )
अनुकंपा नियुक्तीसाठी विवाहितेने केली होती मागणी
विवाहितेचे वडील शासकीय सेवेत लिपिक होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला (विवाहितेच्या आईला) अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली होती. मात्र सेवेत असताना तिचा मृत्यू झाला. आता आईच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्याला नियुक्ती मिळावी, अशी मागणी विवाहितेच्या मोठ्या बहिणीने केली. आईच्या मृत्यूनंतर तिच्याविवाहित मुलीला नियुक्ती दिली जाऊ शकत नाही, असे महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०११ रोजी स्पष्ट केले होते. यानंतर लहान विवाहित मुलीने १२ मार्च २०१३ रोजी अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज केला होता.
राज्य सरकारने फेटाळली होती मागणी
मृत सरकारी कर्मचाऱ्याच्या कायदेशीर वारस आणि त्याच्या प्रतिनिधींपैकी एकास अनुकंपा तत्वावर नोकरी प्रदान करणे आवश्यक आहे, असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने २६ फेब्रुवारी २०१३ रोजी जारी केले होते. त्यामुळे लहान मुलीचाही अर्ज महाराष्ट्र शासनाने २३ एप्रिल २०१३ रोजी फेटाळला हाेता.
नियुक्तीबाबत न्यायाधिकरणाचे निर्देश उच्च न्यायालयाकडूनही कायम
महाराष्ट्र शासनाने मागणी फेटाळल्यानंतर विवाहित मुलीने अनुकंपा नियुक्तीसाठी न्यायाधिकरणासमोर (मॅट) अर्ज केला होता. या अर्जाला २४ मार्च २०१७ रोजी परवानगी देण्यात आली. संबंधित विवाहित मुलीला अनुकंपा तत्वानुसार नियुक्तीबाबत विचार करावा, असे निर्देश राज्य शासनाला देण्यात आले. उच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.
Compassionate appointment : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने कर्नाटकमधील कोषागार संचालक व्ही. व्ही. सोम्यश्री आणि एनसी संतोष विरुद्ध कर्नाटक राज्य या खटल्यानुसार अनुकंपा तत्वाच्या नियुक्ती मंजुरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
हे अनुकंपा तत्वाच्या उद्देशाविरुद्ध ठरेल : सर्वोच्च न्यायालय
अनुकंपा तत्वावर नोकरी देणे म्हणजे कुटुंबाला अचानक आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सक्षम करण्यासाठी आहे. विवाहित मुलीची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे म्हणजे अनुकंपा तत्वाच्या विरुद्ध असेल. कारण विवाहित मुलगी ही मृत कर्मचार्यांवर म्हणजे तिच्या आईवर अवलंबून होती, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे तिला मृत कर्मचार्याच्या मृत्यनंतर अनेक वर्षांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याचा अधिकार मिळणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
Married Woman cannot be said to be ‘dependent’ on her deceased mother for compassionate appointment: Supreme Court
Read story: https://t.co/hDRkPeQMzt pic.twitter.com/rWeNPcbf8k
— Bar & Bench (@barandbench) October 6, 2022