सांगली : खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ | पुढारी

सांगली : खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा :  खरसुंडी (ता.आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ मंदिरात नवरात्र उत्सवास घटस्थापनेने मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने नाथनगरीत उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेनिमित्त श्रींची सदरेवरील बैठी पूजा बांधण्यात आली आहे.

आज दुपारी मुख्य मंदिरात मंत्रोपचाराच्या जयघोषात विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर श्री पुजकांनी धुपारती व शाही लवाजम्यासह अन्य मंदिरात घटस्थापनेसाठी प्रस्थान केले. यावेळी औंध (जि.सातारा) येथून आलेल्या यमाई ज्योतीचे स्वागत करण्यात आले. घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवादरम्यान मंदिरात त्रिकाल धुपारती, उत्सव मूर्तीची विविध रूपातील सालंकृत पूजा , जागर असे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांसाठी मंदिर अहोरात्र दर्शनासाठी खुले राहणार आहे. नवरात्र उत्सवासाठी भाविकांच्या वतीने पालखी व धूपआरती मार्गावर भव्य मंडप आणि विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

३ ऑक्टोबर रोजी सिद्धनाथ मंदिरात हरजागर आणि ४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त साखर वाटपाचा सोहळा होणार आहे. ३ ऑक्टोबरला चिंचाळे हद्दीतील देव सिमोलंघ्घन होणार आहे. रात्री नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर नवरात्र उत्सवाची सांगता होईल. यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात होणाऱ्या या नवरात्र उत्सवामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button