सांगली : बुकिंग शिवशाहीचे, प्रवास मात्र साध्या गाडीचा, परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार | पुढारी

सांगली : बुकिंग शिवशाहीचे, प्रवास मात्र साध्या गाडीचा, परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एका प्रवाशाने स्वारगेट ते तासगाव असे शिवशाहीचे वातानुकूलित ऑनलाइन तिकीट काढले. मात्र त्याला साध्या बसने प्रवास करण्याची वेळ आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. तसेच अतिरिक्त आकारलेले पैसे देखील परत देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही या प्रवाशाने केला आहे.

याबाबत संबंधित प्रवाशी सुमित देवर्षी यांनी तासगाव आगार व्यवस्थापकांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, स्वारगेट ते तासगाव प्रवासासाठी देवर्षी आणि त्यांची पत्नी अशी दोन तिकीट ऑनलाईन शिवशाही वातानुकूलित बसची बुकिंग केली होती. दरम्यान तासगावसाठी ही बस उपलब्ध नसून तुम्हाला साध्या बसनेच प्रवास करावा लागेल, असे अचानक स्वारगेट बसस्थानकावर त्यांना सांगण्यात आले. यावेळी संबंधित प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. एसटी बसची अवस्था आणि प्रवासात झालेला त्रास यामुळे संबंधित प्रवाश्याने तासगाव आगारामध्ये तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीला दाद न देता टाळाटाळ करण्यात आली.

दरम्यान, वातानुकूलित बसचे तिकीट आकारून साध्या बसने प्रवास करावा लागल्याने अतिरिक्त लावलेले पैसे तरी किमान द्यावेत,अशी मागणी देवर्षी यांनी केली. मात्र त्यासाठी मोठी प्रक्रिया असून तुम्हाला 8 दिवसांत पैसे परत करू असे सांगण्यात आले. दरम्यान, हा प्रकार घडून महिना झाला तरी अद्याप पैसे न मिळाल्याने देवर्षी यांनी तासगाव आगार व्यवस्थापकांना अर्जद्वारे लेखी तक्रार केली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button